कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांनी विकृ़त लिखाण केले आहे, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.
नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा निषेध केला. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी विविध घटकातून चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुबेर यांच्या पुस्तकावर शहीद गोंविद पानसरे विचारमंचर्फे परिसंवादाचे शाहू स्मारक भवनात आयोजन करण्यात आले. संयोजकांना दोन्ही बाजू लोकांसमोर मांडायच्या होत्या. परंतु, कुबेर यांच्या बाजूने कुणी उपस्थित राहिले नाही.
सावंत म्हणाले, कुुबेरांनी लिहिलेल्या या पुस्तकात नथुराम गोडसे, गोळवलकर, सावरकर यांचे फोटो छापले आहेत. त्यांचे उदात्तीकरणही केले आहे. आताच्या राजकारणातले फडणवीस, गडकरी यांची भलावण केली आहे. यावरून कुबेर यांनी कोणत्या मानसिकतेतून हे पुस्तक लिहिले आहे, हे समोर येते. त्यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची नोंद घेण्याचे टाळले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासंंबंधी लिहिलेले नाही. संभाजी महाराजांच्या चांगल्या कामगिरीचे उद्दात्तीकरण केलेले नाही. यावरूनच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा त्यांचा डावही लक्षात येतो. म्हणूनच सहा महिन्यांपूर्वी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे यांनी पुस्तकावर बंदीची मागणी केली; पण याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने कुबेरांवर शाई फेकली. या कृत्यानंतर तरी पुस्तकातील बदनामीकारक मजकूर वगळण्यासाठीची व्यापक चर्चा सुरू झाली, हे महत्त्वाचे आहे.
यावेळी काँग्रेसचे ॲड. गुलाबराव घोरपडे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, जिजाऊ ब्रिग्रेडच्या सुनंदा चव्हाण, अनिल चव्हाण यांनी कुबेरांनी संभाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगितले. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बाबा ढेरे यांच्यासह श्रोते उपस्थित होते. दिलदार मुजावर यांनी आभार मानले. सुनीता अमृतसागर यांनी सूत्रसंचालन केेले.