कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे रूप आद्य इतिहासकारांनी लपवून , त्यांना विविध मैफिलींच्या कुंपणात अडकवून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले असल्याची टीका इतिहास संशोधक प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी केली.छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांच्या टेंबे रोड येथील कार्यालयात शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. पठाण हे ‘छत्रपती संभाजी महाराज - तेजस्वी व्यक्तिमत्त्व’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील होते.डॉ. पठाण म्हणाले, आद्य इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराज यांना जाणीवपूर्वक बदनाम केले आहे. न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी इतिहासातील अनेक चुका दुरुस्त केल्या; पण दुर्दैवाने त्यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतच्या चुका दुरुस्त करण्याचे राहून केले. वा. सी. बेंद्रे आणि कमल गोखले यांनी इतिहासाची मूळ कागदपत्रे मिळवून संभाजी महाराज यांच्यावर लिखाण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे; तर ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनीही आपल्या तीन ग्रंथांमधून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाबरोबर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असणाऱ्या संबंधांवर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. पन्हाळागड परिसराचा कारभार शिवरायांनी संभाजी महाराजांकडे दिला होता; पण इतिहासकारांनी संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवल्याचे लिखाण करून मूळचा इतिहास झाकून ठेवला; पण त्याची री आजही ओढली जात असून, हा नजरकैदेचा इतिहास पन्हाळगडावर भावी पिढीला सांगितला जात असल्याचे दुर्दैवी आहे, अशीही खंत पठाण त्यांनी व्यक्त केली. अनेक इतिहासकारांनी त्यांना विविध मैफिलींत अडकवून बदनाम केले व त्यांच्या खऱ्या पराक्रमाचे शौर्य लपवून ठेवले हे दुर्दैवाचे असल्याचे ते म्हणाले.संभाजी जगदाळे यांनी प्रास्ताविक केले, तर बाबूराव कदम यांनी स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने टेंबे रोड येथील कार्यालयात शनिवारी आयोजित व्याख्यानात प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव कदम, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे हे उपस्थित होते.
चुकीच्या इतिहासाद्वारे संभाजी महाराजांची बदनामी
By admin | Published: March 11, 2017 11:51 PM