कोल्हापूर : गेले तीन वर्षे मागणी करूनही शासन दाद देत नसल्याने संभाजीनगर परिसरातील तरुण मंडळांच्या कार्यक र्त्यांनी सोमवारी रात्री उशिरा येथील विभागीय क्रीडा संकुलाचे ‘छत्रपती संभाजी महाराज क्रीडासंकुल’ असे नामकरण केले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयघोषामध्ये कार्यकर्त्यांनी केवळ १0 मिनिटांमध्ये फलक लावत त्यावर भगवा ध्वजही फडकविला. रात्री उशिरा पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि सोडून दिले.येथील संभाजीनगर परिसरातील या क्रीडासंकुलाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी या परिसरातील तरुण मंडळांनी गेले तीन वर्षे शासनाकडे केली आहे; परंतु याबाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. म्हणूनच गेल्या चार दिवसांपासून विभागीय क्रीडा संकुलाचे नामकरण करण्याची तयारी या परिसरातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली होती.त्यानुसार रात्री ११ वाजता फत्तेसिंह सावंत, सचिन सावंत, राकेश भोसले, उमेश पवार, अजित जाधव यांच्यासह संभाजीनगर तरुण मंडळ, नाईट कॅम्प, आयडियल स्पोर्टस क्लब, ओम गणेश तरुण मंडळ यांच्यासह या परिसरातील मंडळांचे कार्यकर्ते क्रीडा संकुलासमोर जमले.अशाप्रकारे नामकरण होणार याची कुणकुण लागल्याने येथे दोन पोलीस तैनात केले होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर फत्तेसिंह सावंत आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. थोड्याच वेळात फोन केल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे या ठिकाणी आले. त्यांनीही कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला.मात्र या ठिकाणी संभाजी राजांच्या जयंतीच्या आधी जर हा फलक येथून काढला किंवा भगवा झेंडा उतरविला तर महाराष्ट्र पेटेल आणि आम्ही सर्वजण शिवाजी पुतळ्याजवळ उपोषणाला बसू, असा इशारा फत्तेसिंह सावंत यांनी दिला. एवढ्यात काही कार्यकर्ते कमानीवर चढले आणि त्यांनी फलक लावून, त्यावर भगवा ध्वज फडकवला.आधीपासूनच तयारीहा फलक लावण्यासाठी तेथील बांधीव फलकाचे माप आधीच कार्यकर्त्यांनी घेतले होते; त्यामुळे मापानुसार फलक तयार केल्याने तो अतिशय चांगल्या पद्धतीने तेथे बसवून त्यावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. ड्रीलसाठी लाईट मिळाली नाहीतर म्हणून जनरेटरही सोबत आणला होता.
विभागीय क्रीडा संकुलाला संभाजी महाराजांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:58 AM