प्रदीप शिंदे ल्ल कोल्हापूरविमानतळाच्या धर्तीवर राज्यात एस. टी. महामंडळातर्फे तेरा नवीन बस पोर्ट उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानकाचा समावेश आहे. विमानतळावर ज्याप्रमाणे सुविधा मिळतात त्याप्रमाणे सुविधा आता संभाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांना मिळणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात एस. टी. सेवेचा लाभ घेतात. मात्र, बसस्थानकांची अवस्था चांगली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही सर्व स्थिती बदलण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने बस पोर्ट उभारणार आहे. राज्यातील बसगाड्यांची वर्दळ असलेल्या तेरा मोठ्या बस आगारांचा समावेश या महत्त्वाकांक्षी योजनेत आहे. बस आगारांचे बस पोर्टमध्ये रूपांतर केले जाणार आहे. या पोर्टद्वारे प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहे. एस. टी. महामंडळावर आर्थिक बोजा न पडता खासगीकरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये तेरा ठिकाणी बस पोर्ट उभारण्यात येणार आहे. एस. टी. आगारचा काही भाग व्यापारी वापरासाठी दिला जाणार असून, याची मूळ मालकी एस. टी. महामंडळाकडे असणार आहे. त्यामधून एस. टी. महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि रंकाळा बसस्थानकाच्या जागेच्या तुलनेत संभाजीनगर बसस्थानकांची जागा मोठी आहे. संभाजीनगर बसस्थानक बारा एकरांत आहे. त्यामुळे त्याची बस पोर्टसाठी निवड करण्यात आली आहे. अशा मिळतील सुविधा....व्यापारी संकुल, रेल्वे स्थानकापर्यत स्कॉय वॉक, शॉपिंग सेंटर, मिनी थिएटर, बस पोर्टमध्ये सोलर पॅनेल, बस ये-जासाठी स्वतंत्र मार्ग, प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रतीक्षा कक्ष, रेस्टारंट अशा सुविधा मिळणार आहेत. तर भविष्यातील बदल करण्यात येणार आहेत. बस पोर्ट हे बस आगारांचे अत्याधुनिक स्वरूप असेल. बस पोर्टमध्ये कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही.पहिल्या टप्प्यामध्ये बोरिवली नॅन्सी कॉलनी, पनवेल, शिवाजीनगर (पुणे), सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अकोला, मोरभवन (नागपूर) या नऊ बस पोर्टच्या निविदा काढली आहे. दुसऱ्या टप्प्यांत कोल्हापूर संभाजीनगर, सांगली, जळगाव व धुळे या चार बस पोर्टचे काम होणार आहे.
संभाजीनगर बसस्थानकाचे होणार ‘बस पोर्ट’
By admin | Published: January 31, 2017 12:56 AM