कोल्हापूर : करवीरचे अधिपती शाहू छत्रपती यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. त्यामुळे लोकसभेला राज्यभरात कुठेही ‘स्वराज्य’संघटना कार्यरत राहणार नसून आमची सर्व ताकद कोल्हापूरात एकवटणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी स्पष्ट केले.कोल्हापूर येथील न्यू पॅलेसवरील कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजे यांनी यावेळी सर्व चर्चांना पूर्णविराम देत केवळ महाराजांच्या विजयासाठी पडेल ते कष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे.संभाजीराजे म्हणाले, अजूनही महाविकास आघाडीकडून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. परंतू शाहू महाराज लोकसभेला उभे राहणार असून त्यांची आणि लोकांचीही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांच्या विजयापुढे माझ्या सर्व आकांक्षा दु्य्यम असून आमच घर किती एकसंघ आहे हे दाखवण्यासाठीच नुकताच माझा आणि महाराजांचा एक फोटो सोशल मीडीयावर शेअर केला होता.ते म्हणाले, २००९ साली जे धक्के मी खाल्लेत त्यातून मी बरेच शिकलो आहे. तसा प्रकार पुन्हा होणार नाही. एक अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ते दिल्ली गाजवतील असा मला विश्वास आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप चालणार. परंतू आमच्याकडेही शस्त्रे आहेत. मी दिल्ली पाहिलेय. त्यामुळे मी बोलायला सुरूवात केली तर घोटाळा होईल असा शब्दात यावेळी संभाजीराजेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. आमच्या वडिलांचे वय जे विचारतात त्यांना मोदींचे वय माहिती नाही का असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.
शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार
By समीर देशपांडे | Published: March 06, 2024 2:21 PM