कोल्हापूर : खासदार संभाजीराजे हे शांत, संयमी स्वभावाचे आहेत, मात्र मराठा आरक्षणावरून नाशिकमध्ये त्यांचा अवतार पहिल्यांदाच पाहिला. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी चार पत्रे पाठवली, मात्र त्याची दखल न घेतल्यानेच राजे आक्रमक झाले आहेत. राज्यातील आघाडी सरकार त्यांच्यासोबत असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मराठा आरक्षण प्रश्नावरून संभाजीराजे यांंनी २७ मेपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला आहे, याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, आरक्षण प्रश्नावर पंतप्रधान मोदी भेट देत नाहीत, त्यामुळे संभाजीराजे केंद्र सरकारवर तर नियु्क्तीबाबत राज्य सरकारवर नाराज आहेत. शेवटी ते राजे आहेत, त्यांनी जरी अल्टीमेटम दिला असला तरी कोरोनाचा काळ आहे, मोर्चे काढायचे नाहीत, असेही त्यांनी संघटनांना आवाहन केले आहे.
महाविकास आघाडी मराठा आरक्षणाच्या बाजूने असून, संभाजीराजे यांचे समाधानही करू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी आर. के. पोवार, राजेश लाटकर, नविद मुश्रीफ, आदिल फरास, आदी उपस्थित होते.