लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे हे शांत, संयमी स्वभावाचे आहेत, मात्र मराठा आरक्षणावरून नाशिकमध्ये त्यांचा अवतार पहिल्यांदाच पाहिला. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी चार पत्रे पाठवली, मात्र त्याची दखल न घेतल्यानेच राजे आक्रमक झाले आहेत. राज्यातील आघाडी सरकार त्यांच्यासोबत असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मराठा आरक्षण प्रश्नावरून संभाजीराजे यांंनी २७ मेपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला आहे, याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, आरक्षण प्रश्नावर पंतप्रधान मोदी भेट देत नाहीत, त्यामुळे संभाजीराजे केंद्र सरकारवर तर नियु्क्तीबाबत राज्य सरकारवर नाराज आहेत. शेवटी ते राजे आहेत, त्यांनी जरी अल्टीमेटम दिला असला तरी कोरोनाचा काळ आहे, मोर्चे काढायचे नाहीत, असेही त्यांनी संघटनांना आवाहन केले आहे. महाविकास आघाडी मराठा आरक्षणाच्या बाजूने असून, संभाजीराजे यांचे समाधानही करू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी आर. के. पोवार, राजेश लाटकर, नविद मुश्रीफ, आदिल फरास, आदी उपस्थित होते.
अजित पवार, राऊत वाद मिटला
मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यातील वादाबाबत विचारले असते, वाद मिटला आहे. शेवटी भांड्याला भांडे लागते. मात्र, आघाडी सरकार काचेचे भांडे नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यामुळेच खत दरवाढ मागे
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे खत दरवाढ मागे घेण्याबाबत पाठपुरावा केला व मग निर्णय झाला, इतका दरारा पवार यांचा आहे. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांचे आभार मानतो, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
फडणवीसांना टास्क फोर्सचे प्रमुख करा
दीड वर्षे राज्यातील सरकार पाडण्यासाठी देवेंंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, आताही ते हीच भाषा करत आहेत. महाराष्ट्रातील कोरोना आवाक्यात आला आहे, उत्तर प्रदेशमधील मृतदेह नदीत सापडत आहेत, गुजरातमध्ये ७१ हजार मृत्यू लपवले, गोव्यात तर ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे या तिन्ही राज्यातींल कोरोना मृत्यूबाबत अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करून त्याचे प्रमुख फडणवीस यांना करा, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.
सहाव्या गाडीनंतर आता टायर सापडेल
अंबानी याच्या घरासमोरील स्फोटकातील सहावी गाडी एनआयएने ताब्यात घेतली. कदाचित महिन्यांनी टायरही सापडेल. अशी खिल्ली उडवत मंत्री मुश्रीफ म्हणाले, तीन महिने झाले स्फोटकांमागील मास्टरमाईंड सापडत नाही. परमवीर सिंग यांच्या चुकीच्या कारभाराचे पुरावे शिवेंद्र भोजे देण्यास तयार आहेत, मग त्यांना का बोलावले जात नाही.
साखर अनुदान पूर्ववत करा
साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,५०० रूपये करायला तयार नाहीत, त्यामुळे तोटा होत असून, आता अनुदान कमी केले. जोपर्यंत पियुष गोयल या खात्याचे मंत्री आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांचे कल्याण होणार नाही. केंद्राने साखरेवरील अनुदान पूर्ववत करावे, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली.