लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून महानगरपालिकेने येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या मैदानावर ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचे काम सुरू केले आहे. या कामाची पाहणी खासदार संभाजीराजे छत्रपती व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी पाहणी केली.
या पाहणीदरम्यान संभाजीराजे यांनी सदरचे काम दर्जेदार व उत्तम दर्जाचे करण्याबाबतच्या सूचना दिल्या. प्रशासक बलकवडे यांनी खेळाडूंसाठी नियोजित वसतिगृहाचा आराखडा व आवश्यक असणारा निधी प्राप्त होण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, कनिष्ठ अभियंता (प्रकल्प) अनुराधा वांडरे, जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे, स्थायी समिती माजी सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुमार आगळकर, हॉकी प्रशिक्षक व खेळाडू आदी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०५०३२०२१-कोल-हॉकी स्टेडियम व्हिजीट
ओळ - कोल्हापुरातील ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर तयार करण्यात येत असलेल्या ॲस्ट्रोटर्फच्या कामाची पाहणी खासदार संभाजीराजे छत्रपती, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी केली.