कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावरील धर्मांधता आणि वाढती अतिक्रमणे याबाबत माजी खासदार संभाजीराजे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावली आहे. किल्ल्यावरील वाढती अतिक्रमणे आणि धर्मांधता याबाबत राज्यभरातील शिवभक्तांनी संभाजीराजे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत संभाजीराजेंनी दीड वर्षांपूर्वी किल्ल्याला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासोबत बैठकही घेतली होती.या बैठकीत गडावर पशूपक्षी हत्या बंदी लागू करण्याचे निश्चित झाले होते. तसेच तीन महिन्यात गडावरील अतिक्रमणे हटविली जातील, असे आश्वासनही दिले होते. मात्र यातील काहीही झाले नाही. त्यामुळेच पुढची आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी ही बैठक बोलावण्यात आली आहे.याच प्रकरणात त्यावेळी स्थानिक आमदार विनय कोरे यांनीही लक्ष घातले होते. त्यामुळे संभाजीराजे रविवारच्या बैठकीत काय निर्णय जाहीर करणार याकडे शिवभक्तांच लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक राजकारणाचा संदर्भसंभाजीराजे यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकामध्ये स्थानिक राजकारण्यांनी आणलेल्या अडथळ्यामुळे त्यावेळी कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. जिल्हा प्रशासनाची अकार्यक्षमताही याला कारणीभूत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.