विश्वास पाटीलकोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे हे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार होण्यास तयार आहेत परंतू ते थेट शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही या भूमिकेवर आज, सोमवारी दूपारनंतरही ठाम आहेत. मुंबईत रविवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांना पाठिंब्याबाबत विनंती केली. त्यांना वर्षावर येण्याचा सोमवारचा अल्टिमेटम हा खासदार संजय राऊत यांनी दिला होता. तो काय त्यांनी मान्य केला नाही व ते मुंबईहून कोल्हापूरला निघाले आहेत.कोल्हापूरात येवून मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून ते आपली पुढील भूमिका निश्चित करणार आहेत. त्याचसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचीही तयारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागा नव्याने निवडून देण्यासाठी १० जूनला मतदान होत आहे. त्याची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३१ मे अशी आहे. त्यामुळे तसा कुणाच्या पाठिंब्यावर निवडणूकीस सामोरे जायचे हे निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे अवधी आहे.नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्कासंभाजीराजे मावळत्या सभागृहात भाजपकडून राष्ट्रपती कोट्यातून खासदार झाले. परंतू त्यांच्या कोणत्याही पक्षीय चौकटीत किंवा विचारधारेत ते अडकले नाहीत. भाजपने शिव-शाहू घराण्याचा वारस म्हणून राज्यसभेवर पाठवून माझा सन्मान केला आहे. त्यामुळे तीच भूमिका घेवून ते पाच वर्षे सक्रीय राहिले. पक्षाचा शिक्का कुठेही लागणार नाही यासाठी ते प्रयत्नशील राहिले. त्याचा त्यांना दबावगट निर्माण करण्यातही फायदा झाला. आताही ते हीच भूमिका घेवून पुढील वाटचाल करु इच्छितात.शिवसेनेत गेल्यावर अडचणीथेट शिवसेनेत गेल्यावर त्यांना मराठा आरक्षणापासून अनेक प्रश्र्नांवर भूमिका घ्यायला, दबावगट तयार करायला अडचणी येवू शकतात. शिवाय त्यांना मानणारा जो वर्ग महाराष्ट्रभर आहे, त्यांनाही संभाजीराजे यांनी कुण्या एका पक्षाचे मांडलिकत्व पत्करावे असे वाटत नाही. खासदारकीहून मागे असलेला समाज मोठा आहे व त्यांचा संभाजीराजे यांच्यावरही दबाव आहे. त्यामुळेच ते शिवसेनेचा झेंडा हातात घ्यायला तयार नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांतून काहीतरी मध्यममार्ग काढतील अशी अपेक्षा छत्रपती घराण्यास आहे
'वर्षा'वर न जाता संभाजीराजे कोल्हापूरला; 'शिवबंधना'ला नकार पक्का, नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 3:17 PM