कोल्हापूर : दुर्गराज रायगड किल्ल्यावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आज, रविवारी सकाळी सहा वाजता ध्वज पूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात होणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरवर्षी या सोहळ्यास राज्यासह परराज्यांतून लाखो शिवभक्त येतात. मात्र, मागील वर्षापासून कोरोना संसर्गामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. त्यानंतर पुन्हा यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा एकदा केवळ २२ मावळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आज, रविवारी होणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी सायंकाळी पाच वाजता खासदार संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्थानिक सरपंचांच्या उपस्थितीत गड पूजन झाले. त्यानंतर गड चढण्यास सुरुवात झाली. त्यांच्यासोबत केवळ २२ मावळ्यांच्या उपस्थितीत महादरवाजा येथे तोरण बांधण्यात आले. खासदार संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांनी शिकाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. उपस्थितीत शिवभक्त व मावळ्यांसोबत ऐतिहासिक विषयांवर चर्चासत्र झाले. उशिरा रात्री शिकाईदेवीचा गोंधळ व पोवाडा गायन झाले. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, संजय पवार, विनायक फाळके, प्रसन्न मोहिते, उदय बोंद्रे, राम यादव, सत्यजित आवटी, सागर पाटील, योगेश केदार, राहुल शिंदे, सुखदेव गिरी आदी उपस्थित होते.
बावीस मावळ्यांकरिता १२०० पोलिसांचा फौज फाटा
यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने लाखो भक्तांना येण्यास मज्जाव केला आहे. यासह खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका राजसदरेवरून जाहीर करणार आहेत. त्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड गावासह गडाच्या सुरुवातीला व गडावर असे एकूण १२०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे या गडावर पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
आजच्या सोहळ्याचे स्वरूप असे,
सकाळी ६.०० वा. ध्वज पूजन
७..०० वा. ध्वनिमुद्रित पोवाडा गायन
८.३० वा. खासदार संभाजीराजे, यौवराज शहाजीराजे यांचे उत्सवमूर्ती सोबत आगमन
८.४५ वा. शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात
९.०० वा. पालखी सोहळा जगदीश्वर मंदिराकडे रवाना होणार
१०.३० वा. जगदीश्वर मंदिरात रायरेश्वर पूजा
१०.४५ वा. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सांगता
.....