कोल्हापूर : दुर्गराज किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात यौवराज शहाजीराजे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी गडपूजनाने झाली. मुख्य सोहळा आज, रविवारी सकाळी होणार आहे. सोहळ्यादरम्यान खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २५ मावळ्यांकरिता ११०० पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
दरवर्षी या सोहळ्यास राज्यासह परराज्यांतून लाखो शिवभक्त येतात. मात्र, मागील वर्षापासून कोरोना संसर्गामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. त्यानंतर पुन्हा या वर्षीही कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा एकदा केवळ २५ मावळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आज, रविवारी होणार आहे. सकाळी ध्वजारोहण, पालखी सोहळा आणि राजसदरेवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक खासदार संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी सायंकाळी पाच वाजता खासदार संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने व शिवकालीन मर्दानी खेळाने गडावरील वातावरण शिवमय झाले. गडदेवता शिरकाईदेवीचा गोंधळ व पोवाडा गायन झाले. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, संजय पवार, विनायक फाळके, प्रसन्न मोहिते, उदय बोंद्रे, राम यादव, दयानंद हुबाळे, अमर जुगर, दीपक सपाटे, सत्यजित आवटी, सागर पाटील, योगेश केदार, राहुल शिंदे, सुखदेव गिरी, आदी उपस्थित होते.
पंचवीस मावळ्यांकरिता ११०० पोलिसांचा फौजफाटा
यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने लाखो भक्तांना येण्यास मज्जाव केला आहे. यासह खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाला आज, रविवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्याची मुदत आजच संपत आहे. त्यानुसार ते राजसदरेवरून आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे महाडपासून रायगडापर्यंत ११०० पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे. एकूणच परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
आजच्या सोहळ्याचे स्वरूप असे,
- नगारखाना येथे ध्वजपूजन व ध्वजारोहण
- खासदार संभाजीराजे, यौवराज शहाजीराजे यांचे उत्सवमूर्तीसोबत राजसदरेवर आगमन
- शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात होणार असून मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे.
- या दरम्यान संभाजीराजे शिवभक्तांना मार्गदर्शन करणार
- उत्सवमूर्तीसह जगदीश्वराच्या दर्शनासाठी प्रस्थान व महाराजांच्या समाधिस्थळास अभिवादन करून सांगता होणार.