कोल्हापूर : महापूर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवसाला किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर या विषयात हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी विनंती गुरुवारी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना केली.
संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत तोमर यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आधी दुष्काळ, नंतर महापूर आणि नंतर परतीच्या पावसाचा तडाखा; यामुळे शेतक-यांच्या हातातील पिके गेली असून त्यांचे कंबरडेच मोडले आहे. भरीस भर म्हणून अनेक विमा कंपन्याही शेतक-यांना त्रास देत आहेत. काही वर्षांत दहा हजार कोटी रुपयांचा नफा कमणा-या विमा कंपन्या यंदा मात्र निविदांमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. शेतकरी आणि सरकार यांच्या हातावर या कंपन्यांनी तुरी दिली आहे.
याबाबत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आश्चर्य व्यक्त करीत तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेणार असल्याचे सांगून महाराष्ट्रातील शेतकºयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.