कोल्हापूर : येथील संभाजीनगर आणि जोतिबा बसस्थानकांना नवा लूक मिळणार आहे. या दोन्ही बसस्थानकांसाठी ११ कोटी ८० लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिली. पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, स्थानकांच्या विकासकामाला गती मिळणार आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकानंतर संभाजीनगर बसस्थानक हे सर्वाधिक वर्दळीचे आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रवासी याठिकाणी येतात. या बसस्थानकासाठी अद्ययावत इमारतीची आवश्यकता होती. त्यामुळे या स्थानकाच्या नवीन इमारतीसह परिसराच्या सुशोभिकरणासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नातून ९ कोटी ८o लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून नवीन इमारतीसह परिसराचे सुशोभिकरण, ड्रेनेज व्यवस्था, पार्किंग आदी कामे होतील. तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगर येथील बसस्थानकाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांमधून लाखो भाविक जोतिबा डोंगरावर येतात. त्यांच्यासाठी अद्ययावत बसस्थानक उपयुक्त ठरणार आहे. सर्व सुविधांनी युक्त इमारतीसह परिसराचे सुशोभिकरणही या निधीतून होणार आहे. या दोन्ही बसस्थानकांच्या कामांना लवकरच सुरुवात होऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण होतील. कामांचा दर्जा आणि रचना या दोन्हीमुळे ही कामे राज्यातील अन्य बस स्थानकांसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय ठरतील. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचे सहकार्य केल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
चौकट
परिपूर्ण बसस्थानकाची निर्मिती
सन २०१६ मध्ये जोतिबा डोंगरावर विविध प्रकारची विकासकामे केली आहेत. वाडी रत्नागिरी (जोतिबा) हे गाव मी दत्तक घेतले होते. त्यातून वॉटर एटीएम, सीसीटीव्ही, बगीचा विकसित करणे, रस्ते आदी प्रकारची विकासकामे केली आहेत. दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी चार ते पाच राज्यातील भाविक येतात. त्यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी स्वच्छ, सुंदर आणि विकासकामांनी परिपूर्ण बसस्थानकाची निर्मिती केली जाणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
चौकट
प्रवाशांना फायदा
या दोन्ही बसस्थानकांमध्ये हजारो प्रवाशांची वर्दळ असते. ही बसस्थानके विकसित होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.