कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील संभाजीनगर, खोलखंडोबा, राजेंद्रनगर, फुलेवडी, राजारामपुरी, सानेगुरुजी वसाहत हे प्रभाग कोरोना संक्रमणाच्या बाबतीत हॉटस्पॉट झाले आहेत. या परिसरात सध्या सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून उच्चांकी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी ४२८ तर गुरुवारी ४२७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या वाढीचा आलेख चढता आहे. यामुळे पालिका प्रशासनदेखील हादरून गेले आहे.
गेल्या दहा दिवसांत शहरातील ज्या प्रभागात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये कदमवाडी ८३, ताराबाई पार्क ६४, खोलखंडोबा ९४, राजारामपुरी ९१, मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर ८७, संभाजीनगर १०६, राजेंद्रनगर ७९ , फुलेवाडी ७३, सानेगुरुजी १०३ रुग्णांचा समावेश आहे.शहरात जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी अनेकांनी गृहअलगीकरणाचा पर्याय निवडल्यामुळे महापालिकेने निर्माण केलेल्या कोविड सेंटर्समधून अजूनही बेड उपलब्ध आहेत. महापालिकेच्या रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये गुरुवारी ५९ ऑक्सिजनेटेड बेड तर ३९७ नॉन ऑक्सिजनेटड बेड शिल्लक होते.
सर्व १० व्हेंटिलेटर्स बेड फुल्ल आहेत. सध्या कार्यरत असलेल्या ११ कोविड सेंटर कार्यान्वित असून भविष्यकाळात रुग्णांना बेड कमी पडू नयेत म्हणून अंडी उबवण केंद्र, फुलेवाडी, दुधाळी पॅव्हेलियन येथे कोविड सेंटर तयार ठेवण्यात आली आहेत.