सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे हे कधीकाळी आम्हाला आदर्श वाटत होते; मात्र गेल्या काही वर्षातील त्यांचे कार्य पाहिले, तर ते भाजपला समांतर असल्याचे दिसत आहे. मराठा व बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकवण्याचे काम सुरू आहे, असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
स्टेशन चौकात कॉँगे्रसचे लाक्षणिक उपोषण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कोरेगाव-भीमा येथील घटनेशी भिडे यांचा काही संबंध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे. चौकशी व कारवाईला सामोरे जाऊन निर्दोषत्व त्यांनी सिद्ध करायला हवे होते. तरीही या गोष्टी टाळून भिडे व त्यांच्या समर्थकांनी तरुणांना रस्त्यावर चुकीच्या पध्दतीने उतरवले. मराठा व बहुजन युवकांच्या शोषणाचेच हे काम आहे.छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांनाच प्रिय आहेत. मात्र चुकीची माहिती देऊन तरुणांना गोळा केले जाते. चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात भिडे यांचाही तितकाच वाटा आहे. सुरुवातीच्या काळात आम्हाला त्यांचे कार्य आदर्श वाटत होते. त्यामुळे मोहिमांमध्ये आम्हीसुद्धा सहभागी झालो होतो. मात्र त्यांचे कार्य चुकीच्या दिशेने जात असल्याचे दिसून आल्यानंतर आम्ही आता त्यांच्यापासून बाजूला जायचे ठरविले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपमुळे जातीय तेढकॉँग्रेस सत्तेवर असताना जातीयवादी विचाराला थारा दिला नाही. भाजपशी संबंधित सर्व शक्ती जाती, धर्म, समूह यांच्यात तेढ निर्माण करण्यात मग्न आहेत. कॉँग्रेस पक्षाचे काही तरी चुकले म्हणूनच आम्हाला लोकांनी बाजूला केले आणि भाजपला संधी दिली. भाजपने सत्तेवर आल्यानंतर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे आम्ही या जातीयवादी शक्तींविरोधात लढत राहू, असे ते म्हणाले.