आदित्यराज घोरपडे - हरिपूर -शिवाजी विद्यापीठाच्या विविध खेळांच्या निवड समित्यांमध्ये यंदाच्या वर्षी पुन्हा तेच ते सदस्य नेमल्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण शिक्षक संघ आक्रमक झाला आहे. विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी संघाने थेट कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवून दंड थोपटले आहेत.विद्यापीठाच्या इंटरझोनल क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंची निवड करण्यासाठी प्रत्येक खेळासाठी एक निवड समिती नेमण्यात येते. समितीत एक अध्यक्ष, दोन सदस्य व एक निरीक्षक असतो. निवड झालेल्या संघास आॅल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी घेऊन जाण्यासाठी याच समितीमधील दोघांची संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून निवड केली जाते. निवड झाली की, स्पर्धेच्या निमित्ताने देशभर फुकटात फिरायला मिळते. एवढेच नव्हे, निवास व भोजनाची उत्तम सोय होते आणि भत्तारूपी मलिदाही मिळतो. एखाद्या खेळाडूने नंबर काढलाच तर दुधात साखर. ब्लेझरची जुळणी होते. मान-सन्मान मिळतो. गावभर मिरवायला गडी मोकळा. अर्थात सगळेच प्राध्यापक असे ‘लालची’ नाहीत. लाल मातीची इमाने इतबारे सेवा करणारे काही प्राध्यापक याला अपवाद आहेत. महादेव सूर्यवंशी या जयसिंगपूरमधील प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील ‘भानगडी’ शोधून काढल्या आहेत. लेखी पत्रव्यवहार, माहितीचा अधिकार, थेट भेट, चर्चा अशा माध्यमांतून त्यांचा लढा सुरू आहे. विद्वान, वरिष्ठ, संशोधक, अनुभवी अशा अनेक उपाध्या लावून घेणाऱ्या काही क्रीडा प्राध्यापकांना या सच्च्या माणसाचा लढा खुपत आहे. सूर्यवंशी यांना अडचणीत आणण्यासाठीही काहींचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ प्राध्यापकांनी नव्याने सेवेत आलेल्या कनिष्ठ प्राध्यापकांशी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, अन्यथा हा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.निवड समितीत वर्षानुवर्षे तेच ते क्रीडा प्राध्यापक, मर्जीतल्या प्राध्यापकांना दोन दोन समित्यांवर नेमणुका हे दोन कळीचे मुद्दे घेऊन आम्ही कुलगुरूंकडे पाठपुरावा करीत आहे. क्रीडा विभागात काही प्राध्यापकांची मक्तेदारी आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. - प्रा. महादेव सूर्यवंशी (अध्यक्ष : वरिष्ठ महाविद्यालयीन शा. शि. शिक्षक संघ)विद्यापीठास पदके मिळवून देणाऱ्या प्राध्यापकांची त्या त्या खेळाच्या संघ प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी पुन्हा निवड करणे काही गैर नाही. सर्वांना सामावून घेऊन आम्ही काम करीत आहोत. चांगले काम करणाऱ्या अनुभवी प्राध्यापकांना संधी दिली जाते. आमच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. - प्रा. पी. टी. गायकवाड (क्रीडा विभागप्रमुख : शिवाजी विद्यापीठ)फुकटातल्या ब्लेझरसाठी फिल्डिंगआॅल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा संघ किंवा खेळाडूने प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळवला तर विजेत्यास विद्यापीठाकडून ‘कलर अवॉर्ड’ मिळतो. तसेच संघ प्रशिक्षक व व्यवस्थापकास ब्लेझर मिळतो. या फुकटातल्या ब्लेझरसाठी चांगलीच ‘फिल्ंिडग’ लावली जाते. विद्यापीठाच्या क्रीडा विभागास ‘खूश’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतात. रंगीत-संगीत पार्ट्या, मटणाची जेवणं, गिफ्ट, हुजरेगिरी असे विविध मार्ग अवलंबले जातात. काहीजण तर माहिती अधिकाराची भीती घालून आपले काम साधून घेतात.
विद्यापीठाच्या निवड समित्यांवर तेच ते सदस्य
By admin | Published: October 28, 2014 12:03 AM