कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असणारा संशयित आरोपी समीर गायकवाड याने जामीन मिळावा यासाठी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीवेळी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला.आजच्या सुनावणीवेळी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीच्या आक्षेपाबाबतही म्हणणे मांडण्यास वरिष्ठ तपास अधिकारी उपस्थित नसल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दि. १५ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. त्या दिवशी समीरच्या जामीन अर्जाबाबत तसेच राणे यांच्या नियुक्तीबाबतही दोन्हीही बाजूंकडून म्हणणे मांडण्यात येणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर गुरुवारी ही सुनावणी झाली. अॅड. पानसरे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित समीर गायकवाड याचा दोनवेळा जामीन अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला आहे, तर सुमारे एक वर्ष एक महिना कळंबा कारागृहात राहिलेल्या समीरने अॅड. समीर पटवर्धन यांच्यावतीने गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी) सरकारी वकिलांना बोलाविलेखटल्यातील सरकारी पक्षाचे वकील अॅड. शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीबाबत संशयित आरोपींचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात आक्षेप घेतला आहे. त्या आक्षेपाबाबत तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात म्हणणे मांडण्यात येणार होते; पण राणे यांच्यासह वरिष्ठ तपास अधिकारी सुनावणीवेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे न्यायाधीशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांना बोलावून घेतले; पण अॅड. शुक्ल यांनी हा खटला गंभीर स्वरुपाचा व आपल्यासाठी नवीन आहे, त्यामुळे याचे कामकाज पुढील सुनावणीवेळी घ्यावे, अशी विनंती केली. आणखी किती दिवस आत ठेवणार : समीरसंशयित आरोपी समीर गायकवाड याने गुरुवारी सुनावणीवेळी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला. तपास यंत्रणा तपासाचे नाव सांगून आणखी किती दिवस मला आत ठेवणार. माझ्यावर आरोप सिद्ध होऊ शकत नाही, दहा वर्षे आत ठेवल्यानंतर माझी निर्दोष मुक्तता झाल्यास मी कारागृहात उपभोगलेल्या शिक्षेचा उत्तरदायी कोण? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू ठेवावा, मी सहकार्य करेन, पण मला जामीनही मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. समीरचा जामिनासाठी तिसऱ्यांदा अर्जसमीरला अटक : १६ सप्टेंबर २०१५ जामिनासाठी पहिला अर्ज : डिसेंबर २०१५ दुसरा : मार्च २०१६ तिसरा अर्ज : २७ एप्रिल २०१७
समीर गायकवाडचा जामिनासाठी अर्ज
By admin | Published: April 28, 2017 12:00 AM