घन:शाम कुंभार
लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : नेतेमंडळींमध्ये ‘एकमताची’ खलबते सुरू असतानाच स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेकांना उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिल्याने मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांपुढे कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका किती जोर धरते आणि नेत्यांकडे पुढारी कोणते हट्ट धरतात, यावर ‘समझोता एक्सप्रेस’चा वेग ठरणार आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचबरोबर यड्राव हे गाव मंत्र्यांचे असल्याने येथील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सदस्यांनी विकासकामे केली आहेत. त्याला विरोधी असलेल्या यड्रावकर गटाच्या सदस्यांचे सहकार्य मिळाले आहे. यामुळे गेल्या पाच वर्षात दोन्ही गटांमध्ये ‘एकवाक्यता’ दिसून आली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी अंतर्गत प्रोत्साहन मिळाल्याने यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याचा उच्चांक झाला आहे. नेतेमंडळींमध्ये एकमत करण्याचा विचार सुरू झाला आहे. परंतु, स्थानिक पुढाऱ्यांसमोर कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे.
स्थानिक पुढाऱ्यांना समझोता घडवून आणण्यासाठी आपला हट्ट कमी करावा लागणार आहे. यासाठी गाव पातळीवरील विविध पक्ष, गट-तट यांना सामावून घेताना तारेवरची कसरत व स्वत:च्या भूमिकेचा एक पाय मागे घ्यावा लागण्याची शक्यता आहे. यावरच ‘समझोता एक्सप्रेस’चा वेग ठरणार आहे. सर्वांच्या हिताचा आणि ग्रामविकासाचा निर्णय कसा होईल, हे स्थानिक पुढाऱ्यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे.
चौकट - नेत्यांची व्यूहरचना
यड्रावमध्ये राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बाजूने पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर यांनी तसेच विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्यासोबत त्यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, उपसरपंच विजय पाटील आणि भाजपचे आनंदराव साने व औरंग शेख, शिवसेनेचे रणजित निंबाळकर व सतीश प्रभावळकर यांनी निवडणुकीसाठीची व्यूहरचना आखली आहे.
* एकूण मतदार - ६,७३१, स्त्री - ३,२३४, पुरुष ३,४९७ * प्रभाग संख्या - ६, सदस्य संख्या - १७
* स्त्रियांसाठी नऊ जागा व सर्वसाधारणसाठी आठ जागा.