कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने येथील तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा थर साचला होता. याबाबत स्वाभिमानी युवा आघाडीने केलेल्या तक्रारीमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुले यांनी शुक्रवारी तेरवाड बंधाऱ्यावर येऊन पाण्याचे नमुने घेतले. मात्र, आंदोलनकर्त्यांचा संताप ओळखून अचानक येऊन पाण्याचे नमुने घेऊन गेल्याने पंचगंगाकाठचे नागरिक व आंदोलनकर्त्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.दिवाळी सणाच्या सुटीचा फायदा उठवत इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाणी व रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत सोडल्याने प्रदूषित पाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मेले होते. बुधवारी सकाळी तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा थर साचला होता. स्वाभिमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती देऊन पंचनाम्याची मागणी केली होती. मात्र, शुक्रवारी फक्त पाण्याचे नमुने घेण्यात आले. (प्रतिनिधी) नदीतील काळेकुट्ट पाणी प्रोसेसर्सचे नाहीइचलकरंजी : येथील बारा एमएलडीचा रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आठवड्यातून दोनवेळा प्रत्यक्ष भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन निरीक्षण करतात. त्याचा अहवाल आठवड्याला मंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होतो. त्यामुळे तेरवाड बंधाऱ्यातील प्रदूषित पाणी इचलकरंजीतील प्रोसेसर्सचे नसल्याचा खुलासा इचलकरंजी टेक्स्टाईल सीईटीपीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पत्रकावर अध्यक्ष गिरीराज मोहता, श्रीनिवास बोहरा, अजित डाके, संदीप मोघे, संदीप सांगावकर, आदींच्या सह्या आहेत.
पंचगंगेतील प्रदूषित पाण्याचे घेतले नमुने
By admin | Published: November 13, 2015 10:40 PM