कुरुंदवाड : पंचगंगा नदीतील दूषित पाण्यामुळे तेरवाड बंधाऱ्यात मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुले यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन दूषित पाणी व मृत माश्यांचे नमुने घेतले. दरम्यान, पंचगंगेच्या दूषित पाण्याबाबत नेहमी जागरूक व आक्रमक असणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे हे अधिकारी येण्याची वाट पाहत होते. मात्र, सर्वांना चकवा देत अधिकारी येऊन गेल्याने नागरिकांतून आश्चर्य व संतापही व्यक्त होत आहे. पंचगंगेच्या दूषित पाण्याचा प्रश्न शिरोळ तालुक्याला नेहमी सतावत आहे. १५ दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांनी आक्रमक होऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यामुळे दूषित पाण्यात सुधारणा होईल, अशी आशा असतानाच पुन्हा नदीला काळेकुट्ट पाणी आल्याने व मासे मरत असल्याने ‘लोकमत’ने ‘तेरवाड बंधाऱ्यात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच प्रदूषण नियंत्रण मंडळ पुन्हा खडबडून जागे झाले. पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचा रोष ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या विभागाचे क्षेत्र अधिकारी केंदुळे यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली व दूषित पाणी आणि मृत माश्यांचे नमुने घेतले. दूषित पाण्याच्या वारंवार तक्रारीबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी अधिकारी येण्याची वाट पाहत सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्यासह नागरिक बसले होते. मात्र, अधिकारी कधी आले याचा सुगावाच नागरिकांना न लागल्याने व अधिकारी केंदुले यांना बालिघाटे यांनी संपर्क साधल्यावर येऊन गेल्याचे समजताच सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी चकवा दिल्याने संताप व्यक्त होत आहे. जबाबदार घटकांवर कारवाई करणार पंचगंगा नदीवरील तेरवाड हा बंधारा शेवटचा असल्याने व पाण्याचा प्रवाह थांबल्याने दूषित पाण्याची समस्या उन्हाळ्यामध्ये निर्माण होते. मृत मासे व पाण्याचे नमुने घेतले असून, त्याची तपासणी करण्यासाठी चिपळूणला पाठविले आहे. पाणी दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चालू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुले यांनी सांगितले.
तेरवाड बंधारा दूषित पाणीप्रश्नी घेतले नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 11:53 PM