कोल्हापूर : मोक्कांतर्गत कारवाईविरोधात संशयित सम्राट कोराणे यांच्यासह अन्य साथीदारांनी दाखल केलेली आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे अटकेची कारवाई अटळ आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात बाजू मांडली, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी दिली.
यादवनगरात ९ एप्रिल २०१९ ला तत्कालीन प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी मटकाविरोधात कारवाई केली होती. कारवाईवेळी पोलिसांच्या पथकावरच हल्ला झाला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संशयित सलीम मुल्लासह ४४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी ४२ संशयितांवर अटकेची कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. संशयित कोराणे व पप्पू सावला हे दोघे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. यातील काही संशयितांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.त्याचबरोबर संशयित सम्राट कोरोणेंसह साथीदारांनी मोक्काअंतर्गत केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे सादर केली. सर्वोच्च न्यायालयात ॲड. राजा ठाकरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने संशयितांची आव्हान याचिका फेटाळली.