कोल्हापूर : कोल्हापुरातील शांत, कमी वर्दळीचा तसेच उच्चभ्रू वस्ती असलेल्या सम्राटनगर, प्रतिभानगरात महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी केलेल्या रॅपिड ॲन्टिजन चाचणीत १९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे त्या परिसराची वाटचाल समूह संसर्गाकडे चालली असल्याचे दिसून येते.महानगरपालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची अचानक रॅपिड ॲन्टिजन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या चाचण्यांतून एक गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे की, कोणतीही लक्षणे नाहीत परंतु अनेक व्यक्ती कोरोनाबाधित असून त्या व्यक्ती राजरोसपणे कुटुंबात, समाजात फिरत आहेत. त्यांच्यामुळे संसर्गाचा धोका वाढलेला आहे.भाजी मंडईतून २० भाजी विक्रेते कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. मिरजकर तिकटी परिसरात दोन दिवस ॲन्टिजन चाचण्या करण्यात आल्या तेव्हा तेथे १३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. ॲन्टिजन चाचणी केल्यानंतरच त्यांना आपण कोरोनाबाधित असल्याचे कळले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
बुधवारी सकाळी जागृतीनगर, सम्राटनगर व प्रतिभानगर परिसरात महापालिकेच्या आरोग्य पथकाने अचानक नागरिकांची रॅपिड ॲन्टिजन चाचण्या सुरू केल्या. तिन्ही ठिकाणी १४८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली, त्यावेळी तब्बल १९ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तींना आपणाला कोरोना झाला आहे, याची साधी कल्पनाही नव्हती.