इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत बांधकाम विभागाकडील सव्वाआठ कोटी रुपयांची कामे अवघ्या १५ मिनिटांत मंजूर करण्यात आली. मात्र, बजेट शिल्लक नसताना, मागील देणी थकीत असताना व जिल्हाधिकाऱ्यांनी बजेटला मंजुरी दिली नसताना हे विषय सभेसमोर आलेच कसे? तसेच या कामांपैकी मंजुरी न घेता बेकायदेशीररीत्या ७० टक्के कामे सुरू आहेत, असा आरोप करत शहर विकास आघाडीचे गटनेते महादेव गौड यांनी विरोध नोंदवला. शहरातील विविध रस्ते, शौचालये, गटारी आणि अन्य बांधकाम करण्याच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी नगरपालिकेने शुक्रवारी विशेष सभा बोलावली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या. सुरुवातीला नगरसेविका माधुरी चव्हाण यांनी शहरात भटक्या कुत्र्यांचा वारंवार सांगूनही बंदोबस्त केला जात नाही. आयजीएम रुग्णालयाकडे त्यावर लस उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना ‘रामभरोसे’ सोडल्याचा आरोप केला. सुनीता भुत्ते यांनी शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे सांगितले. नगरसेवक तानाजी पोवार यांनी नगरसेवकांनी सांगितलेली कामे होत नाहीत. भविष्यात कामे न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन घेराव घालू, असा इशारा दिला. बांधकाम खात्याकडील कामांच्या निविदांना मंजुरी देण्याच्या विषयाला सुरुवात होताच गौड यांनी विरोध केला. यावरून गौड आणि राष्ट्रवादीचे अशोक जांभळे यांच्यात शाब्दिक वादही झाला. अशातच गौड यांचा माईक बंद पडल्याने त्यांनी माईक फेकून संताप व्यक्त केला. तरीही सभागृहाने विषय मंजूर केले. दरम्यान, सभेनंतर गटनेते महादेव गौड यांनी भागातील चारही नगरसेवकांना समान न्याय दिला पाहिजे; परंतु काही नगरसेवकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. सध्या सभेत मंजुरीसाठी आणलेल्या कामांपैकी मंजुरी घेण्यापूर्वीच ७० टक्के कामे केल्याचा आरोपही त्यांनी केला, तर बांधकाम सभापती लतिफ गैबान आणि नगरसेवक अशोक जांभळे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामे सर्वांना विश्वासात घेऊन सभेसमोर आणल्याचे सांगितले. मक्तेदार तोच; पण नाव बदलले जातेनगरपालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये प्रत्येक वेळी मक्तेदाराचे नाव बदललेले असते. मक्तेदार तोच असतो. कारण एखाद्याचे काम खराब असेल, तर याची माहिती नगरसेवकांना समजू नये यासाठीच हा सगळा खटाटोप केला जातो, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविकेचे पती राजू आलासे यांनी केला.
सव्वाआठ कोटींची कामे मंजूर
By admin | Published: May 28, 2016 12:34 AM