तिघांनी आपापल्या खांद्यावरची पोती उलगडून खाली ठेवली. टोमॅटो भरताना सोईचे व्हावे म्हणून काठ दुमडून लहान केली. टोमॅटोच्या शेतात घुसताना अरुण हळू आवाजात म्हणाला, ‘आता बरकतच बरकत. काही दिवस तरी खिसा गरम राहणार ! कोणी आपल्याला बेकार म्हणणार नाही’.
‘आणि पकडले गेलो तर’, कापऱ्या स्वरात सुरेश म्हणाला.
‘फार तर तुरुंगात जाऊ. हल्ली तुरुंगातील पोळीही खाणावळीतल्या पोळीपेक्षा चांगली असते.’
‘आता बोलू नका. काम करा. लवकर बाहेर पडा.’ मनोजने आदेश दिला.
टोमॅटो तोडून पोत्यात टाकताना सुरेशला आईची आठवण झाली. रात्री ती अनेकदा जागी होते. आता यावेळी ती जागी झाली असेल तर... मी तिला दिसणार नाही. तिला समजणार की मी त्या उंडग्या मुलाबरोबर काही ना काही संकट ओढवून घेणार? आईला झोप येणार नाही. ती बाजेवर उठून बसेल. माझी वाट पाहात जाग बसेल. यापूर्वीही तिने कितीदा तरी मला समजलावले होते की, त्या दोघांच्या संगतीत राहू नकोस. पण मला गावातील मुलाहून त्या दोघांबद्दलच सहानुभूती होती.’
टोमॅटो तोडून पोत्यात भरता भरता सुरेश पुढे पुढे सरकत होता. सुमनच्या घराकडे जात होता. जीवनभर तो अंधाराला घाबरत आला होता. परंतु आज तो समोरच्या लुकलुकत्या प्रकाशाला भीत होता. तिघांपैकी त्याचाच सदरा पांढरा होता. यावर मनोजने चिंता प्रकट करीत म्हटले,‘कोणत्याही स्थितीत तू उजेडात येऊ नकोस !’ यावेळी उजेडाकडे जाताना सुरेशची छाती धडधडत होती. एकसारखी भीती वाटत होती. अचानक सुमन त्याला पाहील; पण तेवढ्यात त्याला आईची आठवण झाली. सर्वांपेक्षा त्याला आईची भीती वाटत होती. जेव्हा कधी तो असे वाईट काम करतो तेव्हा त्याचे मन कचरते. त्यावेळी आईचे फक्त डोळेच दिसतात. त्यात प्रेमापेक्षा कठोरताच अधिक असते. तिच्या कठोर डोळ्यातून ठिणग्या बाहेर पडताना तो पाहत आणि सुरेशला वाटते त्या ठिणग्यांनी तो जळून जाईल, आई काही बाेलत नाही आणि तो तिच्यापुढे मान खाली घालून असह्यपणे क्षमा मागत आहे.
त्याक्षणी त्याची आई त्याला सर्वांत मोठी शिक्षा करते. त्याचा दंड ती त्याला ओढत मंदिरात घेऊन जाते व पुजाऱ्याच्या हातात एक रुपया ठेवून विनवणी करते की, आज याने पुन्हा तेच नीच काम केले आहे, जे करणार नाही म्हणून अनेकदा कान पकडून देवासमोर शपथ घेतली आहे. त्यावर पुजारी नाराज होतात. मंत्रपठण करतात. प्रायश्चित घेऊन तो घरी परततो व काही दिवस पश्चाताप होतो.
आज त्याला वाटत होते की, आईला यातले काही कळू नये. तोच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला आणि सुमनच्या घरापुढचा कुत्राही भुंकायला लागला. तिघेही आपापल्या जागी पुतळ्यासारखे निश्चल उभे होते. सुरेश एकटक सुमनच्या घराकडे पाहत होता. शेजारच्या बांधापलीकडून मनोज हळू आवाजात विचारात होता, ‘काही दिसते का?’
सुरेश हळू आवाजात म्हणाला, ‘नाही.’
कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढतच गेला. सुमनच्या घराची खिडकी अचानक बंद झाली आणि उजेडाची तिरीप अदृश्य झाली. सुरेशची भीती कमी झाली. त्याच्या जिवात जीव आला. एक मोठा उसासा सोडत तो मनोजला म्हणाला, ‘खिडकी बंद झाली.’
‘हीच संधी आहे आटपा लवकर. जे हाती येईल ते तोडत राहा. घरी गेल्यावर पाहात येईल.’, मनाेज म्हणाला.
सुरेशने एका हातात पाेते सांभाळत दुसऱ्या हाताने हाती येतील ती टोमॅटो तोडून पोत्यात भरायला सुरुवात केली. कुत्र्यांचे भुंकणे थांबले होते आणि रानकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. मधूनच पक्षांच्या पंखांची फडफड ऐकू येत होती. रात्र पुढे सरकत होती. सुरेश अंधाऱ्या रात्रीला साक्षी ठेवून स्वत:शीच म्हणाला, ‘एक न एक दिवस या घरात मीही रात्री घालवीन. वीस वर्षांचा झालोय.’ वयाचा विचार येताच त्याला आईचे बोलणे आठवले.
‘सुरेश, तू वीस वर्षांचा झालास. तुझ्या वयाचा कोणताच मुलगा या गावात तुझ्यासारखा बेकार नाही. पुजाऱ्याच्या मुलाकडे बघ, वयाने तो तुझ्यापेक्षा लहान असूनही कमवायला लागला आहे आणि तू...’
सुरेश आपल्या आईचे म्हणणे मुकाट ऐकून घेई. करण त्याला माहीत होते की, खरी हकिगत आईला सांगणे कठीण आहे. तिला काय माहीत पुजाऱ्याचा मुलगा उच्च जातीचा आहे. चांगल्या घराण्यातील आहे. मोठ्या लोकांचा नातेवाईक आहे आणि तो स्वत: नीच जातीतील, एकाकी, कोणाचेच पाठबळ नसणारा एक निराधार गरीब मुलगा आहे.
थंडी वाढत चालली होती. दहिवर पडत होते. अचानक ‘सरसर’ आवाज झाला. सुरेश सतर्क झाला. त्याचे काळीज धडधडू लागले.
‘काय झाले सुरेश?’ मनोज
‘आवाज ‘सरसर’ आवाज’ त्याच्या स्वरात भीती होती.
‘मुंगूस किंवा ससा असेल.’
‘मलाही तसेच वाटते.’ स्वत:च्या मनाची किंमत वाढवत सुरेश म्हणाला. आता तो सुमनच्या घराजवळ पोहोचला होता. तेथील कुत्र्याच्या विचाराने त्याने श्वास रोखून धरला. मुठी आपोआप आवळल्या गेल्या. इतक्यात अरुणचा आवाज आला,’ आता पुढे जाऊ नकोस. दुसऱ्या बाजूने सरळ पुढे ये. मोठ्याने बोलू नकोस. तुझे पोते कितपत भरले आहे?’
‘जवळजवळ पूर्ण...!’
‘मग परत फिर.’