सुमनची खिडकी उघडण्याचा आवाज आला. सुरेशच्या आजूबाजूला अंधुक उजेड पसरला. त्याने वळून पाहिले सुमन दरवाजात उभी होती. एक पांढऱ्या कपड्यातील व्यक्ती तिचा निराेप घेऊन बाहेर आली. सुरेशला वाटले या माणसाला कुठेतरी पाहिले आहे. तो त्याच्याकडेच येत होता. मनोज कुजबुजला, ‘पोत्याआड लपून बस. तो माणूस तुझ्या शेजारूनच रस्त्याकडे जाईल.’
सुमन दरवाजा बंद करून आत गेली. सगळीकडे पूर्ववत अंधार पसरला. येणाऱ्या माणसाची अस्पष्ट आकृती तेवढी दिसत होती. मनाेजच्या सूचनेनुसार सुरेश पोत्याआड लपून बसला. तो माणूस जवळ येत होता. सुरेशची छाती धडधडू लागली. त्याच्या मनात भीतीने घर केले. त्याच्या पापण्या सताड उघड्या झाल्या. त्या गडद अंधारातही तो निरखून पाहण्याचा प्रयत्न करीत होता. पावलांचा आवाज अगदी स्पष्ट यायला लागला. ती व्यक्ती त्याच्या दिशेनेच येत होती. त्याला वाटले आता ती त्याला धडकेल. तेथून बाजूला सरकणेही कठीण होते. ती व्यक्ती एकदम त्याच्याजवळ आली. आता त्याची आकृती स्पष्ट दिसत होती. पण चेहरा अंधारात बुडाला होता. सुरेशचे हृदय घाबरेघुबरे झाले. तो श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला प्रथमच रात्रीच्या शांततेची इतकी तीव्र जाणीव झाली. फक्त येणाऱ्या व्यक्तीच्या पावलाखेरीज कोणताच आवाज त्याला ऐकू येत नव्हता. त्याला दिसत नव्हते. पण जाणवत होते की, काही सेकंदात कोणीतरी त्याच्या पाेत्याला अडखळून पडेल आणि तसेच झाले. ती व्यक्ती पोत्याला अडखळून बांधावरच्या दगडावर आपटली आणि त्याच्या तोंडून दु:खोद्गरा बाहेर पडले. ती व्यक्ती घाबरून म्हणाली, ‘‘कोण आहे तेथे?’’ आणि ‘चोर.. चोर’ म्हणत उठून रस्त्याकडे पळू लागली. आवाज ऐकून सुमनने खिडकी उघडली. तिचे कुत्रे जोरजोरात भुंकत होते. बाहेर कुणीच न दिसल्याने तिने खिडकी बंद केली.
‘‘कोण होता तो?’’ - मनोज
‘‘माहीत नाही’’ - सुरेश
‘‘तुला लागले का?’’
‘‘मला नाही; पण त्याच्या कपाळाला जरूर लागले असेल.’’
‘‘त्याचे जाऊ दे. तू स्वत:कडे लक्ष दे. ताबडतोब बाहेर पड.’’
सुरेशने पोते उचलले व झपाझप रस्त्याकडे चालत गेला. त्याचे दोन्ही मित्र त्याच्यापाठोपाठ होते. पाठीवर ओझे होते. हेलपटत झुंकाड्या खात रस्त्यावर आले होते. ओढा जवळ येताच तिघांच्या जिवात जीव आला. रस्त्याच्या कडेला थोडाच वेळ थांबले व पुन्हा आपल्या घराकडे चालू लागले. सुरेशची भीती हळूहळू कमी झाली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘चोर तर आपण होतो मग तो माणूस आपल्याला भिऊन जोरात का पळाला?’’
‘‘कदाचित त्याला स्वत: ओळखले जाण्याची भीती असावी’’.
‘‘अरुण, ही पोती तुझ्याकडे ठेवून तू सरळ धन्यकुमारकडे जा आणि त्यांना सांग मी माल पोहोचला आहे.’’ - मनोज
तिघांनीही आपल्या पाठीवरची पोती अरुणकडे ठेवली. त्याचवेळी कोंबडा आरवला. वातावरणात थंडी ‘मी’ म्हणत होती.
सकाळी सुरेश उशिरापर्यंत झोपला होता. आई त्याला उठवत म्हणाली, ‘सुरेश उठ. उन्हे वर सरकली आहेत आणि तू निवांत झोपला आहेस.. काही कामधाम करायचे आहे की नाही.’’
आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता, कूस बदलत तो परत झोपला. त्याला उशिरापर्यंत झोपायची सवयच लागली होती. त्याची आई त्याला जोरात हालवून जागे करीत म्हणाली, ‘‘अरे, शीला तुला दोनदा बोलवायला येऊन गेली. उठ आता!’’
झोपेत असतानाही सुरेशला आठवले की, आज शीलाच्या घरी ‘दुर्गाभोजन’ आहे. शीलाने त्याला मदत करण्याबद्दल विनंती केली होती. तेव्हा कुठे अंगावरची मळकी चादर बाजूला करत तो उठला. तो उठताच अंथरुण काढता काढता आई म्हणाली, ‘‘तुझ्या पांधरूणाला टोमॅटोचा वास कसा येत आहे?’’
आईच्या प्रश्नाला उत्तर न देता तो बाहेर गेला. शेजारी शीलाच्या घरी खूपच धावपळ दिसत होती. आसपासचे लोक जमा झाले होते. सुरेशला नळावर तोंड धुताना पाहताच शीला आपल्या अंगणातूनच त्याला म्हणाली, ‘‘ही काय उठायची वेळ आहे? पूजेसाठी मातीचा कुंड बनवायचा आहे. पाहाते तू केव्हा बनवतोस ते! सर्व कामे तशीच पडून आहेत.’’
सुरेशला माहीत होते, शीलाचे वडील ब्राह्मणसभेचे लाेक काय करताहेत?’’
‘‘अरे ! ते तर जेवणाच्यावेळी येणार आहेत.’’ शीलाने त्याच स्वराच उत्तर दिले.
‘‘ठीक आहे. वीस मिनिटात येतोच मी.’’
अर्ध्या तासात लाल मातीचा कुंड घेऊन सुरेश शीलाच्या घरी आला. तेथे पूजेची वेदी बनवली होती. पुजारी पूजेचे साहित्य योग्य ठिकाणी मांडण्यात गुंतले होते. समोर उभे राहून सुरेश म्हणाला, ‘‘भटजीबुवा, हा कुंड कोठे ठेवावयाचा आहे.’’ पुजाऱ्याने मान वर केली आणि सुरेशकडे पाहिले. सुरेश अवाक् झाला. पुजाऱ्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा नव्हता. बँडेजच्या पट्ट्या तेथे लावल्या होत्या. बराच वेळ तो एकटक त्याच्याकडे पाहात राहिला.
- प्रा. रमाकांत म. दीक्षित, फलटण