कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा मंजूर केला. बॅँकेच्या थकीत कर्जामुळे मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीससह अन्य काही कारणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिला का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर पदाची सूत्रे उपाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे दिली आहेत. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, तसेच व्यवसाय व वैयक्तिक कारणांमुळे पक्षाचे काम पूर्णवेळ करता येत नाही. या कारणास्तव संदीप देसाई यांनी रविवारी राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून तो मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी त्यांचा राजीमाना मंजूर केला.
देसाई यांनी आजरा अर्बन बँकेच्या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकीत झाल्याने त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी करण्यात आली आहे. याबरोबरच न्यायालयातही बँकेने वसुलीबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यासह अन्य काही कारणे त्यांच्या राजीनाम्यामागे आहेत का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आपल्या पदाचा कार्यकाळ १६ जानेवारी २०१९ ला पूर्ण झाला आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसाईक कारणांमुळे पक्ष कामाला पूर्णपणे वेळ देता येत नव्हता; त्यामुळे आपण वेळोवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे राजीनामा अर्ज करत होतो. रविवारी पुन्हा अर्ज पाठविला. त्यानंतर तो मंजूर करण्यात आला. तसेच आजरा अर्बन बॅँकेचे बहुतांश कर्ज फेडले असून, किरकोळ रक्कम थकीत आहे. याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही.- संदीप देसाई, माजी महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप
पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यासह वैयक्तिक कारणांमुळे संदीप देसाई यांनी आपल्या पदाचा राजीमाना प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला असून, तो मंजूर करण्यात आला. यानंतर या रिक्त पदांची सूत्रे पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा करून उपाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे दिली आहेत.- महेश जाधव, अध्यक्ष, प. म. देवस्थान समिती