कोल्हापूर : लोकशाहीच्या उत्सवात जनमत अनुभवण्यासाठी हौसे, नवसे, गवसे काय करतील याचा नेम नाही. मात्र, या लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा पुरेपुर वापर कसा करायचा याचा प्रत्यय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एका सलून व्यावसायिकाने दिला आहे. सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील संदीप गुंडोपंत संकपाळ या सलून व्यावसायिकाने आज, गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सायकलवरुन येत त्याने हा अर्ज भरला. सलग तिसऱ्यावेळी तो लोकसभेच्या आखाड्यात उतरला आहे. संकपाळ यांचे उचगावमध्ये सलूनचे दुकान असून २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मैदानात होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवित त्यांनी दहा हजार ९६३ मते घेतली होती. दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी एकदा जनमत अनुभवले आहे.शाहू छत्रपती-संजय मंडलिक यांच्यात मुख्य लढतमहायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नेत्यांकडून प्रचारसभेत सुरु असलेल्या टीका-टीपण्णीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे. दरम्यानच मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. याविरोधात शाहूप्रेमींनी मंडलिकांचा निषेध नोंदवला होता. मतदानाला आता केवळ १९ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचारसभाचा धुरळा उडणार आहे.
कोल्हापुरात सलून व्यावसायिकही लोकसभेच्या आखाड्यात, सायकलवरुन येत भरला उमेदवारी अर्ज
By पोपट केशव पवार | Published: April 18, 2024 3:07 PM