कोल्हापूर : आपआपल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करणाऱ्या या महिलांना सामाजिक बांधीलकीची जाण आहे. त्यामुळे ‘संधीकाली’ हे पुस्तक महिलांना मार्गदर्शक ठरेल, असे मत माजी शिक्षण संचालक अरविंद दीक्षित यांनी व्यक्त केले. करवीर नगर वाचन मंदिरात रजनी हिरळीकर यांनी संपादित केलेल्या ‘संधीकाली’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण चिपळूणकर होते.
दीक्षित म्हणाले, या सर्वजणी स्वतंत्रपणे आत्मचरित्र लिहिण्याएवढ्या सक्षम आहेत. आपआपल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करणाऱ्या या महिलांना सामाजिक बांधीलकीची जाण आहे. हे पुस्तक सर्व महिलांना मार्गदर्शक ठरेल.
रजनी हिरळीकर, दीप्ती कुलकर्णी, रोहिणी पडवळ, वृंदा कुलकर्णी, हेमा गंगातीरकर, स्नेहा वाबळे, उषा कुलकर्णी, गिरिजा गोडे, कमल कुरळे, शैला आठल्ये, वसुधा बावडेकर आणि डाॅ. संजीवनी तोफखाने या बाराजणींच्या आत्मकथनाचा समावेश असलेले हे पुस्तक आहे. प्रवीण चिपळूणकर यांनी आकाशवाणीतर्फे लेखनाचे आवाहन करून आवश्यक ते साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. रजनी हिरळीकर यांनी प्रास्ताविक, तर हेमा गंगातीरकर यांनी परिचय करून दिला. डाॅ. संजीवनी तोफखाने यांनी पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखविले. स्नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे आयोजन मनीषा शेणई यांनी केले.