राम मगदूम - गडहिंग्लज -स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अर्ज भरण्यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांचा मार्ग मोकळा झाला, तरी राष्ट्रवादीत बंडखोरीचे आव्हान कायम आहे.स्व. कुपेकरांनी ‘गडहिंग्लज’मध्ये चढत्या मताधिक्यासह हॅट्ट्रिक नोंदविली. त्यानंतर गतवेळी नव्या चंदगड मतदारसंघाची निवडणूक जिंकून त्यांनी चौथ्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. सरपंचपदापासून विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. विकासकामांतून दोन दशके आमदारकी आपल्याकडे ठेवण्याबरोबरच त्यांनी पक्ष संघटनेची भक्कम बांधणी केली. मात्र, पूर्वीप्रमाणेच या निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे ग्रहण कायम आहे.दीड वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीत देखील संग्रामसिंह यांनी उमेदवारी मागितली होती; परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती विचारात घेऊन संध्यादेवींना उमेदवारी दिली. त्यानंतर संग्रामसिंहांनी जोरदार तयारी केली आणि पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीही मागितली. त्यांच्याप्रमाणेच संध्यादेवी व कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांनीही ‘उमेदवारी’साठी मुलाखत दिली.दरम्यान, स्व. कुपेकरांचे पुतणे संग्रामसिंहप्रमाणेच कुपेकरांचे सहकारी आणि गडहिंग्लज कारखान्याचे संचालक व जि. प. सदस्य अप्पी पाटील यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवरच संध्यादेवींनी निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेतल्याचे समजते.
संध्यादेवींची माघार, तरीही बंडखोरी !
By admin | Published: September 24, 2014 12:30 AM