कोल्हापूर : रस्ता खड्ड्यात, की खड्डे रस्त्यात याचा अनुभव शहरवासीय रोज घेत असताना, सोमवारी पहाटेच्या सुमारास वाळू भरलेला ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यातील खड्ड्यात रुतून बसला. दुपारपर्यंत हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते; त्यामुळे या मार्गावरून वळविलेल्या वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.सीपीआर ते कसबा बावडा मार्गाकडे जाणारा रस्ता खानविलकर पेट्रोलपंपानजीक चॅनल गटर्सच्या खुदाईमुळे किमान दीड महिना बंद राहणार आहे; त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जिल्हाधिकारी मार्गे वळविण्यात आली आहे; पण या नव्या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड भार पडत आहे; त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी ठरलेली आहे, त्या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे.
खड्ड्यात ठिकठिकाणी पाणी साचून तळी बनली आहेत. दोन महिन्यांपूर्वी येथे चॅनल काम केल्यानंतर खुदाईची जागा मातीने भरून मुजवली होती. सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे.सोमवारी पहाटेच्या सुमारास या मार्गावर खड्ड्यात वाळू भरलेला ट्रक रुतून बसला; त्यामुळे वाळूच्या ओझ्याने ट्रक एका बाजूला झुकला. हा ट्रक बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेर दुपारी या ट्रकमधील वाळू दुसऱ्या ट्रकमध्ये उतरून हा ट्रक बाहेर काढला. या दरम्यान, वाहतुकीची कोंडी कमी करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.