लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत नवीन चार हजार ९८७ लाभार्थ्यांना पोस्टामार्फत दरमहा अनुदान वितरित केले जाणार आहे. पोस्टामार्फत अनुदान वितरण घरपोच होणार असल्याने लाभार्थ्यांची हेळसांड व त्रास थांबणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांच्या तपासणीसाठी ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत वॉर्डनिहाय शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती समितीचे शहर अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी दिली.
३० जून २०२० च्या बैठकीमधील ९१६, ४ फेब्रुवारी २०२१ च्या सभेमधील २२६०, १२ जुलै २०२१ च्या बैठकीमधील १८११ अशा एकूण चार हजार ९८७ लाभार्थ्यांना पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस् बॅँक (आयबीबीपी) सेवा केली असून, याद्वारे दरमहा अनुदान वितरित करण्यात येणार आहे. वेदभवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत हे शिबिर होणार आहे.
लाभार्थ्यांनी रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड यांची झेरॉक्स, आयडेंटी आकाराचे सहा कलर फोटो तसेच कागदपत्रांची मूळ प्रत, सध्याचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर, आदी कागदपत्रे घेऊन वॉर्डनिहाय वेदभवन येथे यावे. लाभार्थ्यांना ज्यादिवशी बोलाविण्यात आले आहे, त्याचदिवशी यावे, असे आवाहन खंजिरे यांनी केले आहे.