कोल्हापूर : येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन बंदीने कारागृह अधीक्षकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. कारागृह अधीक्षक हे बंदी निरीक्षण फेरी करत असताना त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तुरुंगाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बंदीवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. किरण ऊर्फ करण प्रकाश सूर्यवंशी (वय ३६, रा. गार्डी, ता. खानापूर, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या न्यायालयीन बंदीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तासगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने किरण सूर्यवंशी हा न्यायालयीन बंदी कळंबा कारागृहात आहे. मंगळवारी सकाळी कारागृह अधीक्षक कळंबा मध्यवर्ती कारागृहात आपल्या सहकाऱ्यांसमवेत बंदी निरीक्षण फेरी व बंदींना भेटून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेत होते. त्यावेळी उभे केलेल्या बंदीमधून किरण सुर्यवंशी हा अचानक पुढे आला. हल्ला करण्याच्या उद्देशाने तो अधीक्षकांच्या अंगावर धावला. त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी कळंबा कारागृहातील तुरुंग अधिकारी प्रवीण यशवंत औढेकर (रा. जेल क्वॉटर्स, अधिकारी निवास, कळंबा) यांनी बुधवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बंदी सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.