जयसिंगपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी (दि. २५) सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
गेली दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये देशभरातील शेतकरी कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत या मागणीसाठी ठिय्या मारून बसले आहेत. मात्र, मोदी सरकार सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपू पाहत आहे. काॅर्पोरेट सेक्टरसाठी हे कायदे केंद्राने मंजूर केले आहेत. देशभरातील शेतकरी आता जागरूक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कायदे आम्ही कदापि लागू होऊ देणार नाही. सोमवारी (दि. २५) देशभरातील शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने याच दिवशी सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा निघणार असून कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ ट्रॅक्टर मोर्चा जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल सरकारने माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र असे न करता वसुलीचा तगादा लावला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही तसेच लॉकडाऊनच्या काळातील बिलांची अजिबात वसुली करू नये, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
फोटो - २१०१२०२१-जेएवाय-०५-राजू शेट्टी