कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीवेळी बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातील सांगलीच्या विजय सदाशिव बोरकर (वय २९, रा. शंभर फुटी रोड, सांगली) या संशयिताला पोलिसांनी सोमवारी अटक केली.लोकसेवा आयोगाने २०१६ मध्ये घेतलेल्या परीक्षेत मुलाखत झाली होती. त्यावेळी संशयित विजय बोरकर या उमेदवाराने नॅशनल टेम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियन न्यू इंग्लिश स्कूल (ता. मिरज, जि. सांगली) येथील स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राबद्दल एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना शंका आली.
पुण्याच्या महाराष्ट्र राज्य आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयांनी प्रमाणपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी क्रीडा अधिकारी शंकर भास्करे यांच्याकडे सोपवली होती. भास्करे यांनी चौकशीअंती सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा स्पष्ट अहवाल दिला.शासनाच्या आदेशानुसार भास्करे यांनी दि. ८ जूनला जुना राजवाडा पोलिसात बोरकरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सोमवारी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित बोरकरला अटक केली. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करत आहेत.