कोल्हापूर : शिवसेनेच्या सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखपदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ६ मे १९८६ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेल्या क्षीरसागर यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख अशा पदांवर काम करून विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. त्यांनी विधिमंडळात टोल, एल. बी. टी., रस्ते प्रकल्प, थेट पाइपलाइन अशा सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. नुकतीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीमध्येही क्षीरसागर यांचा समावेश असून, आता त्यांच्यावर सांगली, साताऱ्याची नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे.
सांगली, सातारा शिवसेना संपर्कप्रमुखपदी राजेश क्षीरसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:37 PM