सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याकडे निघालेल्या उसाने भरलेल्या पाच ट्रॅक्टर-ट्रॉलीवर अज्ञातांनी हल्ला करून जोरदार दगडफेक केली. ट्रॅक्टरच्या टायरी तसेच हेडलाईट फोडल्या. बायपास रस्त्यावर सोमवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. घटनेनंतर वाहनधारकांनी तसेच साखर कारखाना परिसरातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती. एवढी मोठी घटना होऊनही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.सोमवारी रात्री वाळवा, शिराळा व पलूस तालुक्यातून उसाने भरलेल्या पाच ट्रॅक्टर-ट्रॉली बायपास रस्त्यावरून एकापाठोपाठ एक येत होत्या. बायपास रस्त्याला लागून असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर सहा दुचाकीवरून दहा ते बारा संशयित दुचाकी आडवी मारून ट्रॅक्टर-ट्रॉली थांबविण्यास भाग पाडले. काहीजणांच्या हातात तीक्ष्ण हत्यारे होती. त्यांनी प्रथम ट्रॅक्टर, ट्रॉलीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भीतीने चालकांनी पलायन केले. त्यानंतर संशयितांनी टायरीवर तीक्ष्ण हत्यार मारून ते पंक्चर केले. सर्व ट्रॅक्टरच्या हेडलाईट दगड मारून फोडल्या. पाचही ट्रॅक्टर-ट्रॉलीची चाके पंक्चर केली. दहा ते पंधरा मिनिटे संशयितांचा धुमाकूळ सुरू होता. त्यांनी बायपास रस्त्याने पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व साखर कारखाना परिसरातील तरुणांनी गर्दी केली होती. ऊसदराचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना अनेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऊसतोडी रोखण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ऊस वाहतूक रोखून हल्ला करण्याचा प्रकार सांगलीत पहिल्यांदाच घडला आहे. (प्रतिनिधी)तोंडाला रुमालसंशयितांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. तसेच बायपास रस्त्यावर अंधारही होता. त्यामुळे ट्रॅक्टरच्या चालकांना संशयित कोण होते, हे समजू शकले नाही. मध्यरात्री टायर बदलून पोलीस बंदोबस्तात ऊस नेण्यात आला.
सांगलीत ऊस वाहतूक रोखली
By admin | Published: October 27, 2015 11:49 PM