सांगली : ‘अल कुदुस’ दिनानिमित्त आज (शुक्रवार) मुस्लिम समाजाच्यावतीने इस्राईल पॅलेस्टाईनवर करीत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विशेष करून खोजा समाजाचे बांधव सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व अशरफभाई बानकर, उमर गवंडी आदींनी केले. अल कुदुस हा दिवस अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने हा मोर्चा काढण्यात आला. इस्राईल लष्कराने केल्या जाणाऱ्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील हजारो निरपराध नागरिक मारले जात आहेत. यामध्ये लहान मुले व महिलांचा अधिक समावेश आहे. क्रूरतेचा हा कळस आहे. याला अमेरिका पाठिंबा देत आहे. हे हल्ले तात्काळ बंद करुन मानवता प्रस्थापित करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. तत्पूर्वी शहरातील स्टेशन चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यापूर्वी सोहेल बलबंड, महंमदभाई भोजाणी, सलीमभाई पन्हाळकर यांनी विचार मांडले. यावेळी मौलाना सलीमभाई यांनी शांततेचा संदेश दिला. महंमदअली कलवाणी, असिफ भोजाणी, युनूस गिलाणी, सज्जाद अली, अशरिफ नाथाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खोजा समाजातर्फे सांगलीत मूक मोर्चा
By admin | Published: July 25, 2014 11:10 PM