सांगली : अशोका बिल्डकॉन कंपनीस सोळा वर्षे टोल वसुलीसाठी परवानगी देण्याच्या न्यायालयीन निकालानंतर टोलविरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. शासनाने कंपनीला त्यांची नुकसान भरपाई देऊन या वादावर पडदा टाकावा, अशी मागणी समितीने केली आहे. तातडीने याबाबत शासनाने पाऊल उचलले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. दुसरीकडे कंपनीने पोलीस संरक्षणात टोल वसुलीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे टोल वसुलीच्या प्रश्नावरून सांगलीत पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीस सांगलीतील टोल वसुलीकरिता दिलेल्या मुदतवाढीबाबत यापूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तदर्थ जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी सोमवारी दिले. त्यामुळे कंपनीला पुढील १६ वर्षे सांगलीत टोलवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालाची माहिती मिळाल्यानंतर लगेचच सांगलीतील टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली असून, प्रमुख नेत्यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेतली. न्यायालयीन निर्णयास वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने कंपनीच्या नुकसान भरपाईची रक्कम त्यांना देऊन जनतेच्या डोक्यावरील टोलचे ढग हटवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सर्वच सामाजिक संघटना, पक्षीय पदाधिकारी आता टोलप्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे टोलचा हा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) सांगलीत आज सर्वपक्षीय बैठक सांगलीतील टोलच्या प्रश्नावर सर्वपक्षीय टोलविरोधी समितीची बैठक गुरुवारी दुपारी ३ वाजता बोलावण्यात आली आहे. सांगलीच्या काँग्रेस भवनजवळील शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. निमंत्रक सतीश साखळकर यांनी, आंदोलनात यापूर्वी सहभागी असलेले सर्व पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नव्याने काही संघटना या आंदोलनात येण्यास इच्छुक असल्यास त्यांनीही या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या बैठकीत टोलप्रश्नी सर्वांची मते जाणून घेऊन काही निर्णय घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कृती समितीच्यावतीने आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
सांगलीत टोलचा प्रश्न पुन्हा पेटणार
By admin | Published: August 06, 2015 12:46 AM