राजाराम लोंढे -- कोल्हापूर --जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने मोठा गाजावाजा करीत बड्या थकबाकीदारांच्या दारात ‘सनई-चौघड्या’चा गजर केला; पण या आवाजाचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही. या सनई-चौघडा दारात वाजविलेल्या संस्थांकडील थकबाकीची रक्कम जवळपास ११३ कोटी होते; पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून सव्वा कोटीच वसूल झाला आहे. बॅँकेचा एनपीए पाहता आगामी ५० दिवसांत बॅँकेपुढे १६२ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान असून, बड्या थकबाकीदारांची मानसिकता व वसुलीचा वेग पाहता बॅँकेपुढे अडचणी येणार, हे नक्की आहे. बॅँकेवर नव्याने संचालक मंडळ कार्यरत झाल्यानंतर वसुलीबाबत कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानुसार गांधीगिरी मार्गाने सनई-चौघडा घेऊन, बड्या थकबाकीदारांच्या दारात जाऊन वसुलीची मोहीम सुरू आहे. १० जानेवारीला उदयसिंगराव गायकवाड कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, बीजोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील-कौलवकर, ‘इंदिरा-तांबाळे’च्या अध्यक्षा विजयामाला देसाई, तंबाखू संघाचे डॉ. संजय पाटील यांच्या घरांसमोर सनई-चौघडा वाजविला. यावेळी गायकवाड यांनी आठ दिवसांत, तर डॉ. पाटील यांनी चार-पाच दिवसांत पैसे भरण्याची तयारी दर्शविली होती. वसंतराव पाटील यांनी पाच लाखांचा, तर देसाई यांनी तब्बल १ कोटी १६ लाखांचा धनादेश बॅँकेकडे दिला. वसुली पथक घरी जाऊन महिना उलटला तरी गायकवाड व डॉ. पाटील यांनी अद्याप बॅँकेकडे भरणा केलेला नाही. धनादेशाची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांनी पुन्हा डीडी दिल्याचे समजते. देसाई यांनी ओटीएसपैकी २० टक्के रकमेचा धनादेश दिला; पण प्रत्यक्षात पाच टक्क्यांप्रमाणे १८ लाख रुपये भरणार असल्याचे सांगण्यात आले. शिरोळ, गडहिंग्लज शहरांतील दहा ते बारा थकबाकीदारांच्या दारात संचालक गेले; पण फारसे काही हाताला लागले नाही.धास्तीने दीड कोटीची वसुलीजिल्हा बॅँकेचे संचालक बड्या थकबाकीदारांचे कान उघडण्यासाठी सनई-चौघड्यांचा आवाज करीत दारात गेले; पण त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट छोट्या थकबाकीदारांनीच धास्तीने पैसे भरले. यातून सुमारे दीड कोटी रुपये वसूल झाले.
सनई-चौघड्यांनीही कर्जबुडव्यांचे कान उघडेनात
By admin | Published: February 10, 2016 12:41 AM