जहाँगीर शेख -- कागलमहाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून असलेली पदे आता राज्य संवर्गात समाविष्ट करून त्यांना ‘ब’ दर्जा दिला आहे. यामुळे आता स्वच्छता निरीक्षकांच्या नेमणुका आणि बदल्या राज्य सरकारच्या हातात गेल्या आहेत. नगरपालिका वर्तुळात याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वाढते शहरीकरण आणि शहरांचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता नगरपालिकांमध्ये स्वच्छता निरीक्षक या पदाला खूप महत्त्व आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, साथीचे रोग प्रतिबंधक उपाययोजना, गटर स्वच्छता, मलनि:स्सारण याशिवाय विविध सण, उत्सव, कार्यक्रम, अशा विविध कारणांना मनुष्यबळ पुरवठा करणे, अशी अनेक कामे स्वच्छता निरीक्षकांना करावी लागतात. नगरपालिकांमध्ये हॉटेल व्यवसाय परवाने, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, अतिक्रमण हटाव पथक, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना प्रतिबंधक पथक, शौचालय अनुदान, घरकुल अनुदान प्रस्ताव, अशी कामेही स्वच्छता निरीक्षकांकडेच असतात. तर महानगरपालिकांमध्ये आरोग्य अधिकारी त्यानंतर मुख्य स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक आणि वॉर्ड इन्स्पेक्टर अशी पदांची विभागणी असते. लोकसंख्येनिहाय ही पदे असतात.यापूर्वी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक जरी महाराष्ट्र शासन करीत असले तरी स्थानिक पातळीवरील आरोग्य विभागाशी संबंधितच व्यक्ती स्वच्छता निरीक्षकाचा पदभार स्वीकारून हे काम करीत असे. तसेच बदली होण्याचा प्रश्न नव्हता. आता शासनाच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांद्वारे स्वच्छता निरीक्षकांची निवड होईल, तसेच दर तीन वर्षांनी बदलीही होणार आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
स्वच्छता निरीक्षक पदे राज्य संवर्गात समाविष्ट
By admin | Published: March 22, 2017 11:21 PM