कोल्हापूर : महापालिकेतील संजय भोसले यांना करनिर्धारक, संग्राहक या पदावरून अखेर हटवण्यात आले. घरफाळा घोटाळा प्रकरणात तत्कालीन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचा फिर्यादीसंदर्भात केलेला खुलासा समाधानककारक नाही. स्वयंस्पष्ट आणि मुद्देनिहाय नाही. या घरफाळा प्रकरणाविरोधात तक्रारी वाढत आहेत, असा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि. ९) दिले.भोसले यांची महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण विभागात अंतर्गत लेखापरीक्षकपदी बदली करण्यात आली. सहायक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे घरफाळा विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. घरफाळाच्या १४ प्रकरणांत महापालिकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणावरून तत्कालीन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विद्यमान करनिर्धारक संजय भोसले यांसह चारजणांवर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी भूपाल शेटे यांनी महापालिकेकडे तक्रार केली. यावरून महापालिकेने संजय भोसले यांना २८ ऑक्टोबरला नोटीस पाठवून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. भोसले यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. याचवेळी भोसले यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या असून करनिर्धारक पदावर ठेवणे सयुक्तिक होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या विभागात बदली करण्याचा प्रस्ताव उपायुक्त निखिल मोरे यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला होता.