शिरोळ : कोरोना महामारीमुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग यांना मिळणारे अनुदान ऑक्टोबर २०२० पासून थकीत होते. संबंधित लाभार्थ्यांना थकीत अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी, यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी पावणेपाच कोटी रुपये थकीत पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी दिली.
विविध पेन्शन योजनेतील १६ हजार १७४ लाभार्थ्यांची ४ कोटी ७३ लाख २३ हजार रुपये थकीत पेन्शन जमा करण्यात आली आहे. तालुक्यात कष्टकरी शेतमजूर लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने निराधारांना आर्थिक आधार मिळावा म्हणून योजनेतील लाभार्थ्यांची संख्याही मोठी आहे. पेन्शन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे थकीत पेन्शन मिळणेकामी पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२० पासूनचे थकीत अनुदान मंजूर केले आहे. याकामी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांचे सहकार्य लाभले असून, लाभार्थ्यांनी बँकेत गर्दी टाळून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही टाकवडेकर यांनी केले आहे.