कोल्हापूर : आठवडा बाजार, किराणा मालाचे दुकान, मंगल कार्यालयात वाढप्याचे काम करून शिक्षण पूर्ण केलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे विद्यार्थी डॉ. संजय सुभाष लठ्ठे यांची ‘इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्ड’साठी निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीने त्यांची निवड केली असून त्याअंतर्गत त्यांना पाच वर्षांसाठी ८३ लाख रुपयांचे संशोधन अनुदान मंजूर केले आहे.मूळचे सांगोला (जि. सोलापूर) येथील असलेले डॉ. लठ्ठे यांचे पदार्थ विज्ञानाच्या बायोमिमिक्री या शाखेमध्ये संशोधन कार्य सुरू आहे. पाण्याला अवरोध करणारे कोटिंग काच आणि धातूंसाठी तयार करण्याबाबत ते संशोधन करत आहेत. तसे झाल्यास चारचाकी वाहनांना पावसाळ्यात वायपरची गरज भासणार नाही. खिडक्या व इमारतीवरील काचेची तावदाने निव्वळ पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करता येतील. लोखंडी वस्तू गंजणार नाहीत. त्याचप्रमाणे पाण्यात मिसळलेल्या विषारी घटकांना विलग करण्यासाठी मेम्ब्रेन तयार करण्याबाबतही त्यांनी संशोधन केले आहे. ‘इन्स्पायर योजने’अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात संशोधनासाठी ते रूजू झाले आहेत.पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमध्ये त्यांना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत प्रवेश मिळाला. एम.एस्सी. (पदार्थ विज्ञान) विषयात त्यांनी प्रथम श्रेणी मिळविली. विद्यापीठात (२००५-०७) असताना राज्य शासनाची ‘एकलव्य मेरिट स्कॉलरशीप’ त्यांना मिळाली. विद्यापीठात त्यांनी पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून पाण्याला अवरोध करणारे कोटिंग तयार करण्याचे संशोधन प्रा. ए. व्ही. राव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. पीएच.डी.मधील संशोधनाच्या आधारे त्यांची इस्तंबूल (तुर्की) येथील कोच विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरेटसाठी (आॅक्टोबर २०१० ते सप्टेंबर २०१२) निवड झाली. धुक्यामध्ये सुद्धा स्पष्ट दिसावे, यासाठी काचेवर कोटिंग तयार करण्याबाबतचे त्यांचे संशोधन होते. तेथे त्यांनी सलग दोन वर्षे संशोधन केले. त्यानंतर सेऊलमधील कोरिया विद्यापीठात (आॅक्टोबर २०१२ ते मे २०१३) हायड्रोजन वायू निर्मितीवरील संशोधनासाठी तसेच पाण्यात मिसळलेल्या विषारी घटकांना वेगळे करण्यासाठी मेम्ब्रेन तयार करण्याच्या संशोधनासाठी निवड झाली. याचदरम्यान त्यांना जपान सरकार पुरस्कृत ‘जपान सोसायटी फॉर द प्रमोशन आॅफ सायन्स’ची प्रतिष्ठेची शिष्यवृत्तीही मिळाली. डॉ. लठ्ठे यांचे ४४ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी १५ शोधनिबंध सादर केले आहेत. (प्रतिक्रिया)या अवॉर्डच्या माध्यमातून देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. शिवाय आजपर्यंत केलेल्याकष्टाचे चीज झाले. - डॉ. संजय लठ्ठे, संशोधक विद्यार्थी, सांगोला.गरीब परिस्थितीतून डॉ. संजय लठ्ठे यांनी घेतलेले शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी ही सर्वच तरुणपिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाची आहे. - कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.
संजय लठ्ठेंची ‘इन्स्पायर’ भरारी
By admin | Published: October 07, 2015 12:28 AM