म्हाकवे : आगामी लोकसभा निवडणूक मी शिवसेनेकडूनच लढविणार असून, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनापासून करवीर तालुक्यातून माझ्या निवडणुकीचा प्रचारही सुरू केला असल्याची घोषणा हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी बुधवारी येथे केली. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख संजय पवार प्रमुख उपस्थित होते. मंडलिक यांनी ही घोषणा करून निवडणुकीचे रणशिंगच फुंकले व ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबतची संदिग्धताही तूर्त तरी संपुष्टात आली.
मुरगूड नगरपालिका विकासकामांच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत १६ डिसेंबरला मंडलिक यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असे जाहीर केल्याने राजकीय खळबळ उडाली होती. त्यामुळे मंडलिक राष्ट्रवादीकडून लढणार का, अशी विचारणा होत होती. प्रा. मंडलिक म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांतून माझ्याबाबत विविध पक्षांचे लेबल लावून रोज वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. त्यामुळे मी नेमका कोणत्या पक्षाचा, याबाबत सर्व कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे; परंतु दिवंगत मंडलिक यांच्यापासून कोणताही वेगळा निर्णय घेताना कार्यकर्त्यांची मते विचारात घेण्याचा आपला रिवाज आहे. याशिवाय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनादिवशी करवीर तालुक्यातून माझ्या लोकसभेचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मी शिवसेनेचाच आहे हे वेगळे आणि वारंवार सांगायची गरज नाही.’
जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, ‘कागल तालुक्यातील काही मंडळी आपली राजकीय अडचण दूर करण्यासाठी प्रा. मंडलिक यांना जवळ करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे; परंतु प्रा. मंडलिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असून, ते कायमच ‘मातोश्री’च्या छत्रछायेखालीच राहतील. प्रा. मंडलिक यांच्या माध्यमातूनच कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा होईल.’
स्वागत व प्रास्ताविक मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांनी केले. संचालक शिवाजीराव इंगळे सपत्नीक यांच्या हस्ते धार्मिक विधी झाले. यावेळी आर. डी. पाटील, सचिन रावळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले म्हाकवेकर, प. पू. परमात्मराज महाराज, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, पंचायत समिती सभापती कमल पाटील, संचालिका राजश्री चौगुले, शेखर सावंत, विश्वास कुºहाडे, नंदकुमार घोरपडे, जयसिंग भोसले, धनाजी बाचणकर, प्रकाश पाटील, आनंदा मोरे, आदी उपस्थित होते. बापूसाहेब भोसले-पाटील यांनी आभार मानले.‘आई जेऊ घालिना अन् बाप भीक मागू देईना’कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. साखरेचे दर जास्त होते, त्यामुळे एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचा तोडगा मान्य केला; पण सध्या साखरेचे दर प्रचंड घसरल्याने बँकांच्या मूल्यांकनातही घट झाली आहे. त्यातच सरकार याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही, त्यामुळे साखर धंदा अडचणीत येऊन कारखानदारांची अवस्था ‘आई जेऊ घालिना अन्बाप भीक मागू देईना’ अशी झाली असल्याची टीका मंडलिक यांनी केली.