आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही आता संजय मंडलिकांनी शाहू महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ
"शाहू महाराज यांच्याबद्दल वैयक्तिक टीका कोणीही करणार नाही असं या निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हा चंद्रकांतदादा पाटील, मुश्रीफ साहेब यांनी पेपरमध्ये सांगितलं होतं. या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या रणांगणात लाखाच्या पुढ लीड वाढत चाललं आहे हे दिसून आल्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत. त्यांनी वक्तव्य पाठिमागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
या वक्तव्याच उत्तर कोल्हापूरातील लोक मतांद्वारे देतील. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे कोल्हापूरकरांना पटलेलं नाही, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल तर जनता योग्य उत्तर देईल, शाहू प्रेमी या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतील. या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रातील उमटतील. त्यांच्यापाठिमागे बोलवता धनी कोण आहे हे त्यांनी शोधावे, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असंही सतेज पाटील म्हणाले.
संजय मंडलिकांचे वक्तव्य काय?
आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. नेसरी ता. गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या सभेत बोलताना मंडलिक म्हणाले, माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार अशी विचारणा करत मंडलिक यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहावं. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका आत्ताच्या शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तिमत्वावर टीका केली जात आहे. यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे असा टोला शरद पवारांनी लगावला.