देवाळे वार्ताहर
संजय पाटील
देवाळे :
ग्रामीण भागात बहुतांशी गावांत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान व गावठाण क्षेत्रात ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय स्वार्थापोटी ही अतिक्रमणे हटविण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बोटचेपी भूमिकेमुळे दिवसेंदिवस ही अतिक्रमणे वाढत चालली आहेत. परिणामी, अतिक्रमणाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पूर्वीची अतिक्रमणे काढून नव्याने होणारी अतिक्रमणे रोखण्याची काळाची गरज बनली आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या गायरान, गावठाण, पाणंद रस्ते व गाव तळेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली आहेत. गायरान क्षेत्र हे प्रामुख्याने डोंगर किंवा माळरान आहे. गायरानात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून शेती केली जात आहे. या ठिकाणी जनावरांना शेड, काही ठिकाणी पक्की घरे ग्रामस्थांनी बांधली आहेत. गावठाणसुद्धा घरे, दुकाने, जनावरांना शेड, चारचाकी पार्किंगसाठी शेड उभे केले आहे.
ही अतिक्रमणे ज्या त्या वेळी हटविणे गरजेचे असताना मात्र ग्रामपंचायतीकडून राजकीय हित साधण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यातून अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून बडगा उगारलाच तर अगोदर गावातील अन्यत्र झालेले अतिक्रमण हटवा मग माझ्या अतिक्रमणाला हात लावा, अशी अरेरावी ग्रामस्थ करतात. यामुळे दिवसेंदिवस या अतिक्रमणात भरच पडत आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या गावाशिवेचा व पाणंद रस्ता शेतीपयोगी माल व साहित्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना सोयीचे असते; पण हे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत.
तालुक्यातील महसूल व भूमिअभिलेख कार्यालयाने तालुक्याच्या गाव रस्त्यांची व गावाशिवांना अतिक्रमणापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़. मात्र, दिवसेंदिवस अतिक्रमणाचा सपाटा वाढत आहे़ परिणामी, जुने ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते सध्या बेपत्ता झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे़
गावाशिवेचा रस्ता, पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शेतीपयोगी माल, साहित्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे़ पाणंद रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांची भांडणे होऊन प्रकरणे न्यायालयात पोहोचत आहेत. मात्र, पाणंद रस्त्याच्या, गाव रस्त्याचा प्रश्न सुटण्याऐवजी जटिल होत आहे. गावांच्या परिसरातील जंगलाची तोड करून त्या ठिकाणी शेती केली जात आहे; परंतु वनविभाग बघ्याची भूमिका घेत या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे़ शासकीय जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्रामस्थांमधून होत आहे.
प्रतिक्रिया....
‘ग्रामपंचायतीच्या गायरान, गावठाण व गाव पाणंद रस्ता आदी ठिकाणी ग्रामस्थांनी अतिक्रमणे केल्यास गावच्या विकासाला खीळ बसते. अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांचे सहकार्य असेल तर अतिक्रमणे काढणे कोणत्याही परिस्थितीत शक्य आहे.’
मा. उपसरपंच जयवंत कदम, आवळी, ता. पन्हाळा