कोल्हापूर : ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅँका आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देताना नाक मुरडतात. कर्जाची सरकार हमी देत असल्याने आता त्यांना कर्जाचे वाटप करावेच लागेल. अन्यथा, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देत ग्रामीण भागात नागरी बॅँकांचे जाळे विणले असून, बॅँकांनी या योजनेतून मराठा समाजातील तरुण, तरुणींना उद्योजक बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील नागरी बॅँक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संजय पवार म्हणाले, या पूर्वीच्या महामंडळांच्या कर्ज योजनेच्या अनुभवामुळे बॅँका घाबरत असल्याचे चित्र आहे; पण आता घाबरण्याची गरज नाही. पाच लाखांपर्यंतच्या ८५ टक्के कर्जाला आणि त्यापुढील ७५ टक्के कर्जाला शासन हमी देणार आहे. तरीही राष्ट्रीयकृत बॅँका सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांनी लाभार्थ्यांची कुंचबणा करणे बंद करून कर्जाचे वाटप केले पाहिजे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नागरी बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेत जास्तीत जास्त तरुणांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनविण्यासाठी हातभार लावावा.जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी ४५, तर राष्ट्रीयकृत बॅँकांनी ९५ प्रकरणे अशा १४० प्रकरणांच्या माध्यमातून ९.५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. हा आकडा समाधानकारक नसून, महामंडळाने कर्जाची हमी घेतल्याने कागदपत्रांचे फारसे जंजाळ न करता कर्ज उपलब्ध करून द्या.
नागरी बॅँक असोसिएशनचे संचालक दत्तात्रय राऊत यांनी प्रास्ताविक केले. वीरशैव बॅँकेचे संचालक सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजे विक्रमसिंह घाटगे, कागल बॅँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, महामंडळाच्या समन्वयक शुभांगी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नागरी बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ठेवी अधिक कर्जे वाटप कमीजिल्ह्यातील अनेक बॅँकांमध्ये ठेवींच्या प्रमाणात कर्जाचे वाटप नसल्याने अनेक बॅँका, पतसंस्थांच्या तरलतेच्या रेशोवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगले कर्जदार शोधा, जाग्यावर जाऊन उद्योगाची खातरजमा करून कर्ज वाटप करण्याची सूचना अरुण काकडे यांनी केली.
प्रत्येक बॅँकेत वेगळा कक्षया कर्ज प्रकरणातून बॅँकांचा तोटा होणार नाही, याची खात्री देत संजय पवार म्हणाले, प्रत्येक नागरी बॅँकेने महामंडळाच्या कर्ज प्रकरणासाठी वेगळे कक्ष करावेत. जेणे करून ग्राहकांना ते सोईचे होईल.