कोल्हापूर : राज्यसभेसाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत व कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय पवारांना शिवसेनेने संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज, गुरूवारी दुपारी एक वाजता संजय राऊत व संजय पवार आपले उमेदवारी अर्ज भरण्यात आहेत.विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला. बुधवारी दिवसभर संजय राऊत व संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जांसोबत लागणारी कागदपत्रे तयार करण्यात आली. या दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिक रवाना झाले आहेत. त्यात आप्पा बुकशेट, अभिजित बुकशेट, अमोल निकम, प्रविण पालव, बाळासाहेब कदम, राहूल भांदिगरे, बापू कोळेकर, आदींचा समावेश आहे. राऊत आणि पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सोबत जाणार आहेत.संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्षशिवसेनेकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असला तरी अजूनही हा शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग समजला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना संधी दिली जावी या हालचाली थांबलेल्या नाहीत. शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
राज्यसभेसाठी संजय पवार आज अर्ज दाखल करणार, शिवसैनिक कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 1:08 PM