गडहिंग्लज : खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे सुपारी बहाद्दर आहेत. खोट्या व भावनिक प्रचारातून ते महायुतीला बदनाम करीत आहेत. मात्र, मायाळू लोकांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भावनिक प्रचाराला थारा मिळणार नाही,असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लजमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, अभिनेते गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. रोहित पवार यांनी इंदापूर येथील बनावट व्हिडीओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीची बदनामी चालवली आहे, असा आरोपही मिटकरी यांनी केला.खासदार मंडलिक म्हणाले, स्वाभिमानी नेते व कार्यकर्त्यांमुळेच गडहिंग्लज-चंदगडचा विकास झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांना कुणी दत्तक घेण्याची गरज नाही.आमदार राजेश पाटील म्हणाले, शाहू छत्रपती हे सोज्वळ सज्जन गृहस्थ आहेत. परंतु, त्यांच्या प्रवक्त्यांच्या खालच्या पातळीवरील प्रचारातून जिल्ह्यातील राजकारण कलुषित होत आहे. जिल्ह्याचे पालकत्व मुश्रीफांकडे असताना तालुक्यांना दत्तक घेण्याची भाषा प्रवक्त्यांनी करू नये.यावेळी पालकमंत्री मुश्रीफ, गोविंदा, महेश काळे, संजय संकपाळ, महेश सलवादे, एल. टी. नवलाज यांचीही भाषणे झाली. सभेला गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, किरण कदम, रमेश रिंगणे, वसंत यमगेकर, जयसिंग चव्हाण, उदय देसाई, अनिता चौगुले आदी उपस्थित होते. सिद्धार्थ बन्ने यांनी स्वागत केले. रफिक पटेल यांनी सूत्रसंचलन केले. गुंड्या पाटील यांनी आभार मानले.
राऊत, आव्हाड हे सुपारी बहाद्दर; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 6:49 PM